पहाटेच विकासकामे पाहणारे अजितदादा पुन्हा होणे नाही…..Miss You Dada
पहाटेची वेळ..मला आठवतो तो गणेश चतुर्थीचा दिवस होता..अगदी प्रसन्न मनाने मी सहयोग समोरच्या सुशोभित केलेल्या रस्त्याने वॉकिंग करत होतो.
शांत वातावरण होतं.नवीन लावलेल्या वीजेच्या दिव्यांनी रस्ते उजळून निघाले होते.रस्त्यावर वाहनांची व माणसांची अजून ये जा नव्हती. पहाटेचे ५ वाजून ४७ मिनिटे झाले होते.
…..त्याचवेळी मा.अजितदादांचा ताफा सहयोगच्या गेटमधून बाहेर पडत होता.एकामागून एक दहा बारा गाड्या असतील.मनात विचार चमकून गेला.एवढ्या पहाटे अंधारात अधिका-यांसोबत विकासकामांची पाहणी करणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता असावा.हेच अजितदादांचे वेगळेपण दादांच्या प्रेमात पाडते.
लोकप्रतिनिधी कसा असावा ? त्याचे व्हिजन काय असावे ?वक्तशीरपणा कसा असावा? मनात निर्माण झालेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजितदादांनी एका झटक्यात देऊन टाकली.
मा.अजितदादा म्हणजे कामाने झपाटलेला एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी.
विकासकामे दर्जेदार आणि उत्तम होण्यासाठी स्वतः बारकाईने पाहणी करणारा तळमळीचा लोकप्रतिनिधी म्हणून दादा आपला अभिमान वाटतो.म्हणून म्हणावं वाटतं लोकप्रतिनिधी असावा तर अजितदादांसारखा.
लोकशाही शासन व्यवस्थेत लोकप्रतिनिधी कार्यकुशल आणि विकासात्मक दृष्टी असणारा असेल तर बारामती सारखी अनेक शहरे विकसित होतील.अजितदादा म्हणजे जनहितासाठी ठाम भूमिका घेऊन जाणारे दूरदृष्टी आणि धाडसी नेतृत्व म्हणून सर्वांना परिचित आहे.
आज बारामती अत्यंत वेगाने विकसित होत आहे.सुंदर होत आहे.यामागे दादांचे खूप मोठे योगदान आहे.बारामतीमधीर रस्ते झाडे,ओपन जीम पाहिल्यानंतर आपण परदेशात असल्याचा भास होता.सकाळी अनेक लोक आनंदाने वॉकिंग ट्रॅकवर चालतात. ओपन जीममध्ये व्यायाम करण्याचा आनंद घेतात.
जनहिताची तळमळ, सौंदर्यदृष्टी, वेगळं करण्याची इच्छाशक्ती व धमक,सातत्याने विकासकामांवर लक्ष यामुळे आज बारामतीत बाबुजी नाईक वाडा, शिवसृष्टी,कन्हेरी उद्यान,क-हानदी व कॅनॉल सुशोभीकरण अशा अनेक कामांमुळे बारामतीच्या सौंदर्यात व वैभवात भर पडली आहे.
देश पातळीवर इतक्या वेगाने स्वच्छ व सुंदर शहर म्हणून पुढे येणारे बारामती हे शहर कदाचित एकमेव असेल.याचे संपूर्ण श्रेय अजितदादांना जाते.बारामतीमधील नागरिकांचे खूप मोठे भाग्य आहे की अजितदादांसारखा विकासाची दृष्टी असणारा धडाकेबाज आणि कणखर असा लोकप्रतिनिधी मिळाला होता.
उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी म्हणून ख-या अर्थाने अजितदादा आपल्या पदाला न्याय दिला आणि बारामतीची एक वेगळी ओळख निर्माण केली.
अजितदादांचा कामांचा झपाटा पाहिल्यानंतर मला नेहमी प्रश्न पडतो वयाच्या ६६ व्या वर्षी या माणसात एवढी ऊर्जा येते तरी कुठून…….. ?
पाहावे तेव्हा हा माणूस पहाटे कामाला सुरुवात करतो.दिवसभर कामे,दौरे,बैठका,
जनहिताचे निर्णय,लोकांना भेटणे, रात्री उशिरा झोपणे, पुन्हा पहाटे तेवढ्यात उत्साहाने आणि तडफेने कामाला सुरुवात.
…..खरंच दादा तुमच्या कार्यक्षमतेला आणि उत्साहाला मनापासून सलाम.
पण दादा आज तुम्ही आमच्यात नाहीत…हे अजून मन मानत नाही…..
दादा तुमच्या जाण्याने आम्ही खरंच पोरके झाले आहोत …..तुमचं नसणं आम्हाला क्षणक्षणाला जगणं नकोसं करतंय…….
आज बारामती स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यात दादा तुमचा खूप मोठा वाटा तर आहेच पण मा.उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी खांद्यावर जबाबदारी घेतली आहे अशा सुनेत्रावहिनीसाहेब यांची खंबीर साथ तुम्हाला मिळाली.
माणूस गेल्यावर त्याचे महत्व समजते.दादा तुमचे नसणं किती मोठा आघात आहे.हे आम्हा बारामती करांना पावलोपावली जाणवत राहिल. हीच तुमच्या आयुष्याची खरी श्रीमंती……
दादांसारखा लोकप्रतिनिधी असणं बारामतीकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब होती.पण आता ……
दादानंतर आपली बारामती स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.इतक्या मेहनतीने उभी केलेली स्वच्छ व सुंदर बारामती जपणं हे बारामतीकर म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.तरच दादांचे स्वप्न पूर्ण होईल.
बारामतीत आणखी विकासकामांचा डोंगर उभा राहावा यासाठी विकासाचा वादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांचे
स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आणि ऊर्जा पवार परिवाराला मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…..

लक्ष्मण जगताप सर





