![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/10/Screenshot_2023-10-20-15-55-39-69_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7-1024x681.jpg)
नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पुणे, दि. २०: नीरा डावा कालवा तसेच नीरा उजव्या कालव्याचे रब्बीचे आवर्तन १० नोव्हेंबरपासून सोडावे असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समिती बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, शहाजी पाटील, राम सातपुते, माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदींसह समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.
कालव्याच्या शेवटच्या (टेल) भागात योग्य दाबाने पाणी जाण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करणे आवश्यक आहे. पाणीपट्टीची थकबाकी वसूल करुन त्यातून दुरुस्तीची कामे करुन घ्यावीत. पाणीचोरीचे प्रकार टाळण्यासाठी सिंचन विभागाच्या मदतीला पोलीस बंदोबस्त देण्यात येईल. कालव्याच्या लगत आवश्यकतेप्रमाणे भारनियमन करावे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2023/10/Screenshot_2023-10-20-15-55-43-63_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7-1024x629.jpg)
नीरा उजवा कालव्यासाठी यावर्षी जवळपास ३.५ टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे याबाबत योग्य नियोजन करावे. हे करत असताना सर्व चाऱ्या व उपचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे याची काळजी घ्यावी, असेही श्री. पवार म्हणाले.
यावेळी अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी सादरीकरण केले.