निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण संपन्न

0
12

निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण संपन्न

बारामती,दि.१२: बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी आणि निवडणूक प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाला निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात श्री.नावडकर यांनी मतदानाची प्रक्रिया, ईव्हीएम यंत्र हाताळणी, ईव्हीएम यंत्रांची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरुप मतदान, ईडीसी मतदान प्रक्रिया, दिव्यांग मतदारांचे मतदान, मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे अहवाल, निवडणुकी विषयक कागदपत्रे आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात एकूण १हजार ९३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान प्रत्येक मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळली व त्या संबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिकांच्या आधारे करून घेतली. उपस्थित सर्व मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. प्रशिक्षक व अधिकारी यांनी तेवढ्याच उस्फुर्तपणे मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here