“नभांगन २०२५” आणि “कुरुक्षेत्र २०२५”चा विद्या प्रतिष्ठान येथे जल्लोषपूर्ण उत्सव
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे “नभांगन २०२५” वार्षिक स्नेहसंमेलन आणि “कुरुक्षेत्र २०२५” क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या उत्सवात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा स्पर्धा आणि बक्षीस वितरण
महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक डॉ. बिपिन पाटील आणि श्री. संतोष जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेचे सदस्य डॉ. राजीव शहा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संस्कृतीचा जल्लोष आणि विविध उपक्रम
२० फेब्रुवारी रोजी सकाळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी भव्य दिंडी काढण्यात आली. त्यानंतर थीम डे आयोजित करण्यात आला. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ट्रेझर हंट, दुपारी फोक डान्स, टाय-ब्लेजर-साडी डे पार पडले. संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कला प्रदर्शन आणि माजी विद्यार्थ्यांची भेट
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी कला दालनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रांगोळी, हस्तचित्र, छायाचित्र आणि कविता यांचे प्रदर्शन झाले. त्यानंतर दुपारी माजी विद्यार्थ्यांची वार्षिक सभा पार पडली.
सांस्कृतिक संध्याकाळ – महाविद्यालयाचा मुख्य आकर्षण
संध्याकाळी गदिमा सभागृहात “सांस्कृतिक संध्याकाळ” उत्साहात साजरी झाली. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास आणि सांस्कृतिक कक्षाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा आढावा ध्वनीचित्रफितीद्वारे सादर करण्यात आला.
या कार्यक्रमात एकूण ३४ गटांनी लोकनृत्य, नाटक, चित्रपट गीत, समूह नृत्य आदींच्या माध्यमातून सहभाग घेतला. यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सन्मान चिन्ह पटकावले.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आणि यशस्वी आयोजन
या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, सदस्य डॉ. राजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, विद्यार्थी कार्यक्रम प्रमुख डॉ. परशुराम चित्रगार, सांस्कृतिक समन्वयक प्रा. पल्लवी बोके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अनिल पाटील, क्रीडा प्रतिनिधी अभिषेक मोकाशी, महिला प्रतिनिधी स्वप्नाली भोई, जनरल सेक्रेटरी अभिषेक शिर्के, सांस्कृतिक सचिव प्रथमेश शिंदे आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाच्या अखेरीस वंदे मातरमच्या गजरात या भव्य उत्सवाची सांगता झाली.
