धावत्या बारामतीला क्रीडा नगरी बनवण्याचा संकल्प! मॅरेथॉनच्या निमित्ताने अजितदादांच्या आठवणींना ‘वटवृक्षाची’ सावली
६७ वर्षांच्या वटवृक्षाला ‘अजित वटवृक्ष’ नामकरण; बारामती पॉवर मॅरेथॉनच्या चौथ्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती | भावनगरी संपादक संतोष शिंदे ९८२२७३०१०८
धावपटूंच्या पावलांचा उत्साह, क्रीडा संस्कृतीचा जागर आणि आठवणींचा भावनिक ठेवा… अशा अनोख्या वातावरणात बारामती पॉवर मॅरेथॉनच्या चौथ्या पर्वाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. केवळ धावण्याची स्पर्धा न राहता बारामतीला देशाच्या क्रीडा नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी या स्पर्धेला उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढवला. ५, १० आणि २१ व ४२ किलोमीटर अशा विविध गटांत देशभरातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. दरवर्षी वाढणारा प्रतिसाद पाहता बारामतीची ओळख देशातील महत्त्वाचे क्रीडा केंद्र म्हणून निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मॅरेथॉनच्या निमित्ताने अर्थचक्रालाही वेग
मॅरेथॉनमुळे केवळ खेळाडूंना व्यासपीठ मिळत नाही, तर शहरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळते. बाहेरगावाहून येणाऱ्या धावपटू आणि नागरिकांमुळे स्थानिक व्यवसाय, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. त्यामुळे हा उपक्रम बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे सुनेत्रावहिनी पवार यांनी नमूद केले. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन आणि आयोजकांच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
६७ वर्षांचा वटवृक्ष… आठवणींचा चिरंतन वारसा!

या कार्यक्रमातील सर्वाधिक भावस्पर्शी क्षण ठरला तो ६७ वर्षे जुन्या वटवृक्षाचे ‘अजित वटवृक्ष’ म्हणून करण्यात आलेले वृक्षारोपण. लोकनेते अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
दादांच्या वयाइतकाच असलेला हा वटवृक्ष त्यांच्या आठवणी, विचार आणि कार्याचा जिवंत साक्षीदार म्हणून पुढील अनेक वर्षे बहरत राहील, असा विश्वास सुनेत्रावहिनी पवार यांनी व्यक्त केला.
एका बाजूला धावपटूंच्या पावलांतून भविष्याकडे झेप घेणारी बारामती आणि दुसऱ्या बाजूला वटवृक्षाच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या अजितदादांच्या आठवणी… अशा दुहेरी भावनेतून यंदाची पॉवर मॅरेथॉन विशेष ठरली. बारामतीच्या विकासाचा वेग आणि क्रीडा संस्कृतीचा विस्तार यांचा नवा अध्याय या निमित्ताने सुरू झाला आहे.




