दुष्काळी परिस्थितीचा विचार करता अटल भूजल योजनेची कामे गतीने पूर्ण करा- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
बारामती, दि. ७: बारामती व इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता अटल भूजल योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामात सक्रीय सहभाग घेऊन ती गतीने पूर्ण करावीत; योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभागही वाढवावा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.
अटल भूजल योजनेअंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी नवीन प्रशासकीय भवन येथे आयोजित ‘पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी नाविन्यपूर्ण पद्धती व तंत्रज्ञान’ या प्रशिक्षण सत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सहायक भूवैज्ञानिक सुजाता सावळे, उपविभागीय कृषी अधिकारी रमा जोशी, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता केशव जोरी आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, अटल भूजल योजनेअंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व संबंधित यंत्रणेने लोकसहभागातून कामे पूर्ण करावीत. या योजनेअंतर्गत भूजल पातळी वाढविण्याबाबत झालेल्या यशस्वी कामांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. याअनुषंगाने विहिरीचे पुनर्भरण, नाला बांध दुरुस्ती आदी प्राप्त प्रस्तावावर गतीने कार्यवाही करावी तसेच प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे. दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणूकीचे वर्ष याचा विचार करता तालुक्यात विविध योजनेअंतर्गत सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावीत, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे, अशा सूचना श्री. नावडकर यांनी दिल्या.
तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जलसाक्षरता होण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. भूजल पातळी वाढविण्यासाठी सक्रीय सहभाग घेऊन कामे करावी. पाण्याची गरज पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी अटल भूजल योजनेत गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवावा, असेही श्री. शिंदे म्हणाले.
श्रीमती सावळे म्हणाल्या, अटल भूजल योजना जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीत, इंदापूर ३ व पुरंदर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीत राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत भूजल पातळीचे मोजमाप, जलसुरक्षा आराखडा, पाण्याचे अभिसरण, पाणी बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्यायाने जमिनीत पाण्याची पातळी वाढविणे आदी घटकांवर कामे करण्यात येत आहे. योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती सावळे यांनी केले.
यावेळी अटल भूजल योजनेबाबत जलप्रतिज्ञा देण्यात आली. तसेच योजनाबाबत जनजागृतीदृष्टीने तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिका, भिंतीपत्रके आणि स्टिकरचे विमोचन करण्यात आले.