तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालय दर्जा प्रदान

0
56

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालय दर्जा प्रदान
नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज स्टेट्स ) दर्जा प्रदान केला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ चे कलम १२३ व महाराष्ट्र शासन राजपत्र/अधिसूचना असाधारण भाग चार ब, दि. २२ मे २०२३ अन्वये विहित केलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ स्वायत्त महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतची मानके सन २०२३ चा एकरूप परिनियम क्रमांक १ मधील तरतुदींच्या तसेच विद्यापीठ अनुदान आयोग/संबंधित शिखर संस्था आणि भारत सरकार, महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेकडून वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, परिनियम, आदेश, मार्गदर्शक तत्वे इ. अधीन राहून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०३३-३४ या दहा वर्षांकरिता हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या महाविद्यालयाची स्थापना जून १९६२ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयात सध्या जवळपास १२००० विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयास धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाला असून नॅक, बेंगलोर कडून ए + दर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी डिसेंबर २०१८ साली यूजीसीकडून महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व विषयांचे अभ्यासक्रम तयार करून त्याप्रमाणे परीक्षांचे नियोजन निकाल इ. महाविद्यालय स्तरावर करीत आहे. या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालयाचे रशिया, उझबेकिस्तान, आसाम येथील विद्यापीठ व संशोधन संस्था इ. सोबत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक करार झाले आहेत. याअंतर्गत विविध उपक्रम महाविद्यालय आयोजित करीत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेने अनेकान्त अकॅडेमीची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता केंद्र, सीए फाऊंडेशन केंद्र सुरु केले आहे. महाविद्यालयामध्ये एकूण ११ संशोधन केंद्रे असून ५१ मार्गदर्शक प्राध्यापकांचे अंतर्गत १४० विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा इ. मध्ये देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाविद्यालयाने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या या यशस्वीतेबद्दल व अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जाबद्दल प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here