ताईंना सांगा पदर नीट घ्या…
रात्र बरीच झाली होती…
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो…
आॕफिस मधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता.
काही वेळातच मी मुख्य रस्त्यावर आलो.
थोडं पुढे येत मी मुख्य रस्ता सोडला…
आता कधीतरी दिसणारी वहानांची वर्दळही मंदावली…
रात्रीच्या काळोखातील ती भयाण जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती…
काही वेळातच माझा
एकटेपणा नाहीसा झाला. कारण मला मागुन येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळे मधोमध जाणारी माझी बाईक मी आता एका कडेने चालवू लागलो…
काही सेकंदात एक दांपत्य असलेली बाईक मला ओव्हरटेक करून पुढे गेली…
कदाचित नवरा बायको असावेत…
नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळं जैकेट होतं तर मागे बसलेल्या महिलेनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती…
पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की
बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर…
अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता…!
वाऱ्याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो!
आणि जर तीचा पदर…
चाकात गुरफटला तर ते त्या महिलेच्या जिवावर बेतू शकतं…!
मी झटकन माझ्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणालो…
“ताई, तुमचा पदर… चाकात अडकतोय… तेवढा नीट घ्या…”
एवढं बोलून मी त्यांच्या पुढे निघून गेलो…
मी आपल्याच विचारात गुरफटला होतो की…
पुन्हा एक बाईक मला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली…
मी ओळखलं…
टोपी आणि काळं जैकेट…
पण…
मागे ती महिला… त्याची पत्नी नव्हती…!!!
मी गाडीचा वेग वाढवला आणि विचारू लागलो…
“अहो तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी…..
चाकात पदर… अडकत होता म्हणून मी सांगितलं होतं…”
काही अंतर पुढं आल्यावर त्याने आपली बाईक रस्त्याकडेला घेतली
आणि क्षणभर थांबला तशी मी देखील माझी गाडी पुढं नेत रस्त्याच्या कडेला उभी केली…
“काय झालं भाऊ…?
तुमची बायको मागे बसली होती ना…!
त्या कुठं आहेत…?”
तो माणूस अक्षरशः थरथरत होता. राहून राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता…
काहीच न बोलता त्यानं मागे रस्त्याकडे वळून पाहिलं…
मिट्ट काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच आक्राळ विक्राळ वाटत होता…
आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पहात होता की, नुकताच तो एका भयाण मरणातून जिवंत वाचला होता!
त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती…
“काय झालं…?
तुम्ही इतके का घाबरलात…?
पाणी देऊ का..?”
मी पाठीवरची बॅग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्यासमोर धरली तसा तो समोरचा माणूस म्हणाला…
“माझ्या गाडीवर कोण बसलेलं तू पाहिलंस…?”
“म्हणजे… ती तुमच्या ओळखीची नव्हती…?”
“मी जाॅबवरून घरी निघालोय… एकटाच…
कोणालाही लिफ्ट पण नाही दिलेली…!”
त्या अनोळखी व्यक्तिच बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली…
आता आम्ही दोघेही मागे त्या भयाण काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागलो…
दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक पांढरी धुरकट आकृती दिसू लागली…
दोघेही धडधडत्या काळजानं समोर पाहू लागले . दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले…
एकमेकांशी काहीच न बोलता आम्ही दोघेही आपापल्या बाईक वर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघाले…
काही वेळातच ती व्यक्ति दुसऱ्या रस्त्याने निघुन गेली…
आणि मीही घरी पोहोचलो…
एव्हाना दोन वाजून गेले होते…
अंथरूणावर पडलो पण काही केल्या झोप येईना…!
आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही अविश्वसनीय पाहिलं होतं…
‘आजवर जे घडलं नाही ते आज का घडलं..?’
तो भास तरी नक्कीच नव्हता…
दोन दिवस मी कामावर जाण्याच टाळलं पण किती दिवस घरात बसून राहणार…?
तिसऱ्या दिवशी धाडस करून मी जाॅबला गेलो…
पण कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती…
साडेबारा वाजले… शिफ्ट संपली…
जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागले, पण माझी पावलं जड झाली होती…
गाडीवर बसून किक मारली आणि रस्त्यावर आलो.
नेहमीसारखीच तुरळक वाहनं दिसत होती.
तोच मागून मला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबतच माझं उरलंसुरलं अवसानही गळुन पडलं…
डोकं सुन्न झालं होतं…
आवाज येत होता..
गाडी जवळ आली…
पुढच्या क्षणी ती गाडी मला ओव्हरटेक करू लागली…
मी चोरट्या नजरेने पाहिलं तर गाडीवर दुचाकीस्वार एकटाच होता…!
माझ्या जीवात जीव आला…
काळजातली भीती आता कमी झाली होती…
मी त्या बाईकस्वाराकडं पाहिलं…
आणि किंचित स्माईल दिलं…
तसं बाईकस्वारानेही आपल्या हेल्मेटची काच वर घेतली
आणि…
माझ्याकडे पाहत म्हणाला…
“ताईंना सांगा…
पदर…
नीट घ्या…!”