Homeलेखडॉ. केशव बळिराम हेडगेवार म्हणजे देशभक्त, एक द्रष्टा, कुशल संघटक आणि...

डॉ. केशव बळिराम हेडगेवार म्हणजे देशभक्त, एक द्रष्टा, कुशल संघटक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक

प. पू. डॉक्टर हेडगेवार स्मृतिदिन

डॉ. केशव बळिराम हेडगेवार म्हणजे एक देशभक्त, एक द्रष्टा, कुशल संघटक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक! बळीरामपंत व रेवतीबाई यांच्या या धाकट्या सुपुत्राचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी नागपूर येथे झाला. अगदी लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांचे जीवन अखंड नंदादीपासारखे होते.

ते केवळ आठ वर्षांचे असताना एकदा व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसानिमित्त शाळेत मिठाई वाटण्यात आली. परंतु हे आपल्या गुलामगिरीचे प्रतीक आहे असे म्हणून त्यांनी ती मिठाई फेकून दिली. “हजारो मैल अंतरावरून दूरवर येऊन इंग्रजांनी येथे आपली सत्ता कशी काय प्रस्थापित केली?” असे ते मोठ्यांना प्रश्न विचारीत. हायस्कूलमध्ये शिकत असतानाच ‘वंदे मातरम्’ चळवळीत पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

पुण्यातून मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर कलकत्त्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमधून १९१६ साली ते डॉक्टर होऊन नागपूरला आले. त्यावेळी सर्व सुखे दाराशी आली असता त्यांच्याकडे पाठ फिरवून व आजन्म ब्रह्मचारी राहून भारतमातेची सेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला. १९१८ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या होमरुल लीग चळवळीत ते सहभागी झाले. १९२० च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक पथकाचे नेतृत्व त्यांनी केले. १९२१ साली असहकार चळवळीत जहाल भाषण ठोकल्यामुळे त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली.

१९२७ मध्ये केशवरावांनी मुस्लिमांच्या आक्रमकतेविरुद्ध कुशलतेने व धैर्याने उभे ठाकण्याची जनतेला प्रेरणा दिली. आपल्या राष्ट्रावर ओढवलेले संकट म्हणजे ब्रिटिशांची गुलामी नसून हिंदूमधील एकतेचा अभाव. यासाठी बहुसंख्य हिंदूंना संघटित करून त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करायला हवी या त्यांच्या विचारातून १९२५ साली विजयादशमीला ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ ची स्थापना झाली. जाती, भाषा, प्रांत इ. भेदांनी पोखरलेला हिंदू समाज संघटित करून लक्षावधी स्वयंसेवकांना त्यांनी घडविले. त्यासाठी ‘शाखा’ पद्धती सुरू केली. दररोज एक तास राष्ट्राकरिता प्रत्येक व्यक्तीने द्यायचा असे ठरले. यामधून शारीरिक व्यायाम, बौद्धिक विकास व शाखेतल्या कार्यक्रम माध्यमातून राष्ट्रासाठी त्यागवृत्ती वाढू लागली.

राजकीय पक्षाशी वा गटाशी संबंध न ठेवता संघाने स्वतंत्र व अलिप्त अशी वाटचाल सुरू ठेवली. संघाचा विस्तार महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक इ. राज्यात झाला. देशासाठी डॉक्टरांनी भाऊराव देवरस, रामभाऊ पातुरकर, गोळवलकर गुरुजी, बापूराव भिशीकर असे कार्यकर्ते निर्माण केले. म. गांधी व डॉ. आंबेडकरांनीही संघातील अस्पृश्यतेच्या अभावाची प्रशंसा केली.

प्रगाढ विद्वत्ता, सौजन्यशीलता, झुंजारवृत्ती, सामान्यांशी समरसता, मानवता व हिंदुत्व निष्ठा या सर्वांचा दुर्मिळ संगम डॉक्टरांमध्ये होता. मजूर क्षेत्रात; धार्मिक एकतेच्या क्षेत्रात वनवासींच्या सेवाक्षेत्रात, शिक्षण, ग्राहक, रुग्णसेवा इत्यादी अनेक क्षेत्रात संघाचे स्वयंसेवक लाखोंनी भारतभर कार्य करत आहेत. शेवटी पोलादासारखा डॉक्टरांचा देह अपार कष्ट, धावपळ, दगदग, प्रवास, जागरणे यांनी थकून गेला. युवकांना देशासाठी एक होण्याचा संदेश देणाऱ्या या आदर्श संघटकाची प्राणज्योत २१ जून १९४० रोजी मावळली.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on