“मनके जीते जीत है। मन के हारे हार।
हार गए जो बिन लड़े
उन पर है धिक्कार।
तू माटी का लाल है तू कोई कंकड धूल नहीं।
तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं।”
हमने कहा था हम नमक है महाराज।
अंत में जीत आपकी हुई। अंत में जीत संभा की हुई ।हम नमक है। हम नमक है।”
“तुम नमक नहीं तिलक हो हमारे माथे का।”
“जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है।”

परीक्षण
छावा काळजातच मावेना…
चित्रपट -छावा
दिग्दर्शन-लक्ष्मण उटेकर
निर्माता -दिनेश विजन
कादंबरी- शिवाजी सावंत

कालच मैत्रिणी सोबत छावा पाहून आले. कमालीची ती अस्वस्थता आताही मेंदूला झिणझिण्या आणते आहे.
संभाजी महाराजांनी किती सोसलं! कसली ती सहनशीलता? स्वराज्यासाठी एवढा त्याग एक मराठाच करू जाणे एवढं तर निश्चितच.
बळ एकवटून आणि आतड्याला पिळ पडेस्तोवरचा तो संघर्ष क्षणाक्षणाला अंगावर शहारे उभा करत होता.
दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर सरांची मी मनापासून आभारी यासाठी की छावा हा आजच्या पिढीला तुम्ही खऱ्या अर्थानं दाखवून दिला.कारण संभाजी राजा़ंचा शौर्यानं भरलेला इतिहास फारसा कोणी दाखवला नव्हता. तुम्ही खऱ्या अर्थानं तो दाखवून दिला. छावा वाचला होता छावा पुस्तकातून अनुभवला होता पण तो आज खरच जपला जाणार आहे नव्या पिढीच्या काळजात. म्हणून आभार.
कसला जबरदस्त तो अभिनय? कसलं कमालीचं ते चित्रीकरण, ते शस्त्र ,त्या तोफा, ते दगडी चिऱ्यांच्या पायऱ्या, ते तटबंदी किल्ले आणि संवादानं तर झपाटलं गेलं मन. ए आर रहेमान यांच्या जादुई संगीतानं तर कान तृप्त झाले. खरंच झाले
एकंदरीत साऱ्यांचाच कौतुक हेच या चित्रपटाचं भव्यदिव्य यश म्हणायला हरकत नाही.
छावा काळजात मावेना यासाठी की विकी कौशलनं संभाजी राजे असले अप्रतिम रेखाटले की त्यातला जिवंतपणा आता ही डोळ्यासमोरून जाता जात नाही. त्यांच्या अभिनयाला तोड नाही.
केलेही असतील त्यांनी अनेक चित्रपट पण प्रथम श्रेणीत राहील हा त्यांचा अभिनय.नक्कीच!

ती युद्धनीती ,ती राजनीती रणनीती, तो रुबाब ,तो भावनिक कल्लोळ खरच खूपच छान साकारला त्यांनी शंभुराजे.
श्रीसखी कडं पाहताना त्यांच्या डोळ्यातील ती चमक आणि स्वराज्याबद्दल बोलताना डोळ्यातील पेटून उठलेली आग आताही मनात धगधगते आहे.
संभाजीराजांनी आपल्यासाठी एवढं सोसलं ,हा त्याग, हा खरा इतिहास लक्ष्मणजी तुम्ही दाखवला हेच छावाचं यश आहे.
मनात घर करून गेला तो अक्षय खन्नाचा अभिनय. पाहणा-यालाही औरंगजेबाची चीड यावी इतक्या प्रचंड ताकतीनं त्यांनी औरंगजेब वठवला.खूप वेळानं कळालं की औरंगजेब मध्ये दडलेला अभिनेता तो अक्षय खन्ना होता.
विस्कटलेले पांढरे केस, चपटे गाल ,ती मराठ्यांबद्दलची धगधगणारी चीड ,तो राग या गोष्टींवर कितीतरी मेहनत अक्षय खन्ना आणि मेकअप आर्टिस्टनं घेतली असेल नाही!
एवढं क्रृरपण एकवटून दाखवणं सॅल्यूट अशा अभिनयाला.
संभाजी राजेंना आता दूध कोणी पाजायचं ?सईबाई गेल्यानंतर आऊसाहेबांना पडलेला हा प्रश्न धाराऊनं सोडवला. ती धाराऊ छावा चित्रपटात प्रत्येक क्षणाक्षणाला येसूबाई आणि संभाजीराजें सोबत दाखवली गेली.
नीलकांती नाना पाटेकर यांनी कितीतरी अप्रतिमपणे धाराऊ रेखाटली. खरच अशी ही दुर्मिळ पात्र दाखवून लक्ष्मण उटेकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
सईबाई आणि आऊसाहेबांची सावली बनून राहणाऱ्या धाराऊ या संभाजी राजांचा एक खांदा होती. खरंच याला म्हणतात ऐतिहासिक माणसं .जी जीवाला जीव देणारी होती .यांच्या अशा भूमिकेनं तर इतिहास लोप पावू शकत नाही आजही.
संभाजी राजे ,येसू राणी औरंगजेब ,सोयराबाई, धाराऊ या पात्रांनी तर काळजात खळबळ माजवलीच, पण कविवर्य कलश ,गणोजी, कान्होजी, हंबीरराव मोहिते अगदी हुबेहुब रेखाटले गेले. अभिनयात ते खरे उतरले गेले .उत्तम टीमवर्क साठी खरंच टाळ्या अपू-या पडतील.
श्रीसखी (येसूबाई) ही छबी रश्मिका यांनी रेखाटली. काय बाई ते मोठ्ठाले वेधक डोळे, ते तेज ,तो पदर ,ते कुंकू खरंच सारं मन वेधक होतं ते. तो कणखरपणा ,ते शौर्य आणि त्यांच्या अभिनयाला तर तोडच नाही.
खोट्या नात्यांमधली चीड दाखवणारा तो संवाद बोलताना त्या वेळचा त्यांचा अभिनय खरंच वाखवण्याजोगा होता.
प्रत्येक लढ्यावेळी त्यांची सोबत संभाजी राजांना प्रेरक ठरत होती. त्यांचं मनोबल वाढवत होती. बाईचं मोठेपण पण किती मोठ्या मनानं पडद्यावर दाखवलं गेलं.म्हणून कौतुक. सहनशीलतेचा मोठा आदर्श घालून गेलेल्या येसूराणी आजही मनामनात जिवंत आहेत. रश्मीका तुम्ही खरंच भाग्यवान आहात तुम्हाला पडद्यावर का होईना येसुराणी म्हणून जगता आलं .येसूबाई खरंच छान वठवलीये रश्मीकानं.
शंभुराजे आणि श्रीसखीच्या संवादामुळे आणि त्यांच्या अभिनय, पेहराव्यामुळे तर मी त्यांच्या प्रेमात पडले असं खरंच प्रत्येक जण म्हणत असतील नाही!
“संभा अपनी मौत का जश्न मना कर चला गया। हमें छोड गया अपनी जिंदगी का मातम मनाने
“
हा संवाद औरंगजेबाची मुलगी झीनत म्हणते तेव्हा संपूर्ण थिएटर अगदी स्तब्ध होऊन जातं शिल्लक राहतात फक्त उसाचे आणि हुंदके. अशा या संवादांनी तर चित्रपटात जाण ओतली आहे.
आणखी एका पात्राचा अभिनय इथं मांडण्यासारखा आहे तो म्हणजे कवी कलश होय. हे पात्र विनीत कुमार यांनी प्रचंड ताकतीनं आणि बुद्धीच्या जोरावर गाजवलं .आता त्यांना वेगळी ओळख नाही लागणार ते कवी कलश म्हणूनच ओळखले जातील असच वाटून जातं कैकदा. साहित्यिकांची ,ज्ञानीलोकांची इतिहासानं खरंच कदर केली आहे.त्यांचा मानसन्मान वाढवला आहे.असे नौरत्न त्यावेळी प्रत्येक दरबारी असत हे या चित्रपटातून पहायला मिळालं.
छ.संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यातला तो शेवटचा संवाद काळजात कोलाहल माजवून गेला. डोळे पुसत,अश्रू आवरत कान टवकारत तो संवाद ऐकणं कमालीचं अस्वस्थ करणारं ठरलं.
“मनके जीते जीत है। मन के हारे हार।
हार गए जो बिन लड़े
उन पर है धिक्कार।
तू माटी का लाल है तू कोई कंकड धूल नहीं।
तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं।”
“हमने कहा था हम नमक है महाराज।
अंत में जीत आपकी हुई। अंत में जीत संभा की हुई ।हम नमक है। हम नमक है।”
“तुम नमक नहीं तिलक हो हमारे माथे का।”
“जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है।”
या आणि अशा कितीतरी संवादांनी मन घायाळ होऊन गेलं.
बुऱ्हानपूरची ती लढाई त्यातील ती तलवारबाजी ,ते मावळे त्यांच्यातील ती चपळाई, आईशप्पथ !कसं अभ्यासलं सारं हे?
हंबीरराव मोहिते यांच्या पात्राला खरा न्याय दिला तो अशितोष राणा यांनी .कमी संवाद होते तरी पण सारा चित्रपट त्यांनी दणानून सोडला. खरंच कौतुक.दिलखुलास कौतुक.
लक्षात राहिलेली एक भूमिका सोयराबाईंची. पान खाताना तो पानाचा करकर आवाज आणि त्यांच्या डोळ्यातील तो भाव तो सवती मत्सर ,सिंहासनावर आपल्याच पुत्रानं बसावं यासाठीचा मोह, त्यांनी खूप अप्रतिम असा रेखाटला. दिव्या दत्ता यांचंही खरंच कौतुकच व्हायला हवं जान ओतली तिनं या भूमिकेसाठी.
धाकल्या धन्याच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं.साखळदंडानं करकचून बांधून ठेवलं.सळाया गरम करुन डोळे फोडले. जीभपण खेचून काढली.
देवा! कसल्या या यातना स्वराज्यासाठी त्यांनी भोगल्या.
ही शेवटची श्वास रोखून धरलेली पंधरा मिनिटं नाही विसरता येणार कधीच.
कृरतेची ती झलक ,ती मजल पचवणं खरंच कठीण गेलं.
हुंदका बाहेर पडू नये म्हणून मी खरंच तोंड दाबून बसलेली .पूर्ण छोटू महाराज थिएटर पिन ड्रॉप सायलेन्स होतं .हुंदक्याचे आवाज मात्र कानावर पडत होते.काळजात मावेनासे झालेल्या शंभूराजेना पाहून वाटलं शंभूराजे तुम्ही नसता तर..!! एवढ्या नुसत्या विचारांनं खरंच सांगते मेंदूला झिणझिण्या आल्या.
काय नाही सहन केलं स्वराज्याच्या आपल्या धाकल्या धन्यानं,शंभूराजांनं आपल्या साठी हे पुढच्या पिढीनं तेवढं लक्षात ठेवावं बस्स!
छ.शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा!
धन्यवाद.

©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
७७०९४६४६५३.
(लेखिका वक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)
