गरीब-श्रीमंत मधील दरी वाढल्याची चर्चा…
अमीर होते है जिन्हें
पैसा कमाने का जुनून होता है,
पर जनाब इन अमीरों के पास
कहाँ सुकून होता है…
भारत देशात सद्यस्थितीत अनेक प्रकारचे वाद आहेत. हे वाद जनमानसात चर्चेत असतात, किंबहुना स्वार्थासाठी, राजकारणासाठी, पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळविण्यासाठी जनतेचे लक्ष वळविण्यासाठी निर्माण केलेले असतात. धर्मवाद, जातीयवाद, वर्णवाद, पक्षवाद, स्त्री-पुरुष समानतेचा वाद, असे अनेक वाद असून यामध्ये आणखी एक प्रमुखवाद हा ‘गरीब-श्रीमंत’ यांच्यातील वाद होय.
गेल्या आठवड्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (ऑक्सफॅम) अर्थात विश्व आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत पहिल्या दिवशी वार्षिक विषमता अहवाल सादर झाला. या अहवालात भारताची स्थिती एका स्वतंत्र पुरवणीच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यानुसार भारतात अब्जाधीशांची संख्या वाढली. २०२० मध्ये केवळ १०२ अब्जाधीश होते. ते २०२२ मध्ये १६६ झाले. शंभर श्रीमंत भारतीयांची एकत्रित संपत्ती ६६० अब्ज अमेरिकी डॉलर असून ती देशाच्या १८ महिन्याचे केंद्रिय बजेट एवढी आहे. देशात एक टक्के लोकांकडे ४० टक्के संपत्ती आहे. तर देशातील अर्ध्या लोकसंख्येकडे केवळ तीन टक्के संपत्ती आहे.
सदर अहवालात ‘श्रीमंतावरील लक्ष्मीकृपा’ या शिर्षकाखाली नमूद माहितीमध्ये भारतात केवळ श्रीमंतावरच लक्ष्मीकृपा करणार्या व्यवस्थेमुळे गरिबांची आबाळ होते. श्रीमंतांवर अधिक कर लावण्याची वेळ आली आहे. भारतातील अब्जाधिशांवर त्यांच्या एकूण संपत्तीच्या केवळ दोन टक्के कर आकारला तर ४० हजार ४२३ कोटी रुपये उभे राहतील. त्यात शिक्षणाचे व इतर कामे करता येतील. सन २०२२ मध्ये कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून भारतीय अब्जाधीशांचे संपत्तीमध्ये हजारो कोटीची वाढ झाल्याचे म्हटले आहे. या अहवालात गरीब-श्रीमंत दरी वाढल्याचे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे देशात एक वेळ पुन्हा ही चर्चा सुरु झाली आहे.
मागे २०१६ मध्ये नोटबंदीच्या वेळी सरकारने श्रीमंतांचा काळा पैसा काढण्यासाठी त्यांना धडा शिकविण्यासाठी नोटबंदी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशात श्रीमंतांविरुध्द वातावरण बनले, श्रीमंतांचा व्देष वाढला, त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली गेली. गरीबांनी त्रास सहन केला, शेकडो बळी गेले मात्र श्रीमंत काही गरीब झाले नाही, आणि गरीब श्रीमंत झाले नाहीत.
या उलट कोरोनाचे काळात मोठ्या उद्योगपतींनी व श्रीमंतांनी समाजकार्य केले. मदतीचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, जबाबदारीने कर्तव्य पार पाडले, सरकारला व जनतेला थेट मदत दिली, याची हजारो उदाहरणे सर्वसामान्यांनी अनुभवली. परंतु कोणाचे उपकार मानायचेच नाही, उलट मदत केली तर काय झाले? श्रीमंतांकडे हरामाचे, गैरप्रकारातून, भ्रष्ट्राचारातून, गरीबांना फसवून, शोषण करुन कमविलेले पैसे असतात, असे मानण्यात अनेकांनी धन्यता मानली. श्रीमंत मग तो व्यापारी, उद्योजक, शेतकरी किंवा अधिकारी असो तो चोर असतो, गरीबाची झोपडी उध्वस्त केल्याशिवाय श्रीमंतांचे महाल बांधल्या जाऊ शकत नाही, वगैरे गोष्टी, अनेक चित्रपटातून व सरकारचे फुकट वाटपाच्या धोरणातून हा समज दृढ केला. आणि श्रीमतांचे समाजकार्य, दवाखाने, धर्मशाळा, पाणपोई, विविध उत्सवाला देणग्या, राजकारण्यांना वर्गणी, आदी विविध मदतीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले गेले. तसेही श्रीमंतीसाठी कष्ट घेणार्या श्रीमंतांनी कठोर परिश्रम करुन मिळविलेले धन, संपत्ती सोबतच आजार हे त्यांचे पापाचे भोग आहेत, असे बोलण्याची पध्दत रुढ आहे. मात्र यामुळे समाजकार्य किंवा वर्गणी थांबली नाही, तो संस्काराचा एक भाग आहे.
समाजात श्रीमंत होण्यासाठी सर्वांना संधी आहेत. जिद्द, परिश्रम, चीवटपणा हे गुण कोणीही स्वीकारु शकतो. आता तर श्रीमंतीची गुरुकिल्ली देणारे व्यक्ति, संस्था, मार्गदर्शक आहेत. सरकारच्या योजना आहेत. तसेच त्या-त्या जातीतील धर्मातील श्रीमंत वर्ग मदत करतो, सर्व साधने उपलब्ध असताना श्रीमंतांची संख्या पुरेशी वाढत नाही, फक्त अब्जाधीशच वाढतात असे का? याचा शोध घेतला पाहिजे आणि श्रीमंतांची संख्या प्रयत्नपूर्वक वाढविली पाहिजे.
समाजातील श्रीमंतांचा व्देष करुन त्यांना चोर सांगून आपण श्रीमंत होत नाही. आपल्याला श्रीमंतीचे मंत्र आणि तंत्र आत्मसात केले पाहिजे, प्रयत्नपूर्वक, योग्य दिशा ठरवून, कृतीबध्द आराखडा ठरवून आपण श्रीमंत झालो पाहिजे, नाही तर ‘नाचता येईना, अंगण वाकडे,’ असे म्हणावे लागेल.
शेवटी ‘शेवटी प्रयत्नांती परमेश्वर’ या प्रमाणे प्रयत्नात सातत्य व समर्पण लागते, या आशयाचा शेर आठवतो…
गरीबी सिर्फ एक
मुश्किल हालात है….
बदल जाएगी एक दिन
तेरे कर्मो में अगर वो बात है…
– – – राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
खामगाव, जि. बुलडाणा