गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा; कर्णकर्कश डिजे ‘ने नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालू नका..!

0
4

गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा; कर्णकर्कश डिजे ‘ने नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालू नका..!

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गणेश मंडळांना स्पष्ट इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर पुराव्याधारित कारवाई

बारामती, दि. ३१ : आगामी दहीहंडी व गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश DJ व मोठ्या आवाजाच्या ध्वनीव्यवस्थेमुळे नागरिकांना त्रास दिल्यास संबंधित आयोजक, गणेश मंडळे, डिजे चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिला.

बारामती येथील कविवर्य मोरोपंत सभागृह मध्ये दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव आयोजक आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय व मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, सुपा आणि माळेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दी सह गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार रावडी, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ, सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या समस्या व सूचना थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी देण्यात आली. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या, स्पीडब्रेकर व रस्त्यावरील उंचवटे, विद्युत तारा, वाहतूक नियोजन, मंडप व्यवस्था, DJ व ध्वनीव्यवस्था यासह विविध प्रश्न मंडळांनी मांडले.

उत्सव सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागांनी या अडचणींची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी समस्या गांभीर्याने घेत, आपल्या अखत्यारितील अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी बारामती नगरपरिषदेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांना आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

DJ च्या आवाजाबाबत कठोर भूमिका बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो DJ आणि ध्वनीप्रदूषणाचा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. कायदा पाळून उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या पाठीशी पोलीस प्रशासन पूर्णपणे उभे राहील; मात्र कर्णकर्कश आवाज करून महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही.

“परवानगी घेतली म्हणजे अमर्याद आवाज करण्याची परवानगी मिळाली, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

ध्वनीमर्यादांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित ठिकाणी ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची प्रत्यक्ष मोजणी करण्यात येणार आहे. अंदाज किंवा केवळ तक्रारीवर नव्हे, तर तांत्रिक साधनांच्या माध्यमातून नोंद घेऊन कायद्याने निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन आढळल्यास पुराव्यावर आधारित कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

“मोठा DJ म्हणजे मोठा उत्सव नव्हे”

अतितीव्र आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम, डोकेदुखी, चिडचिड, मानसिक ताण तसेच ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मिरवणुकीत पोलीस अथवा स्वयंसेवकांकडून दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन सूचना मोठ्या आवाजामुळे ऐकू न आल्यास गर्दी व्यवस्थापनात अडथळा निर्माण होऊ शकतो.

DJ च्या आवाजाची मंडळा-मंडळांमध्ये स्पर्धा होऊ नये. मोठी DJ वाहने रस्त्यावर उभी केल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते तसेच गर्दीत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने मंडळांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

स्थापना ते विसर्जनपर्यंत सुरक्षेला प्राधान्य

गणेश मंडळांनी मंडप उभारताना CCTV, विद्युत सुरक्षा, अग्निशमन व्यवस्था, स्वयंसेवक नियुक्ती, महिला व बालकांची सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.

मंडपामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल अथवा अन्य आपत्कालीन वाहनांचा मार्ग अडविला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्युत जोडणी अधिकृत इलेक्ट्रिशियनकडून करून घ्यावी आणि अग्निशामक यंत्रणा उपलब्ध ठेवावी, असेही सांगण्यात आले.

संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, धोकादायक शस्त्रांचे प्रदर्शन तसेच सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणांना थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, सायबर फसवणुकीविरोधात जनजागृती, व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधन यांसारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले.

आरती, भजन, अभंग, ढोल-ताशा, लेझीम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पारंपरिक उत्सवाची ओळख जपावी. केवळ मोठ्या आवाजाला मंडळाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक बनवू नये, असा संदेशही देण्यात आला.

‘सिंगल विंडो सिस्टम’द्वारे परवानगी
गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या मिळविताना अडचणी येऊ नयेत यासाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उत्सवाच्या काळात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून, विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने निश्चित केलेला मार्ग व वेळ पाळणे बंधनकारक राहणार आहे.

“उत्सव तुमचा, सुरक्षा आपली सर्वांची” या भावनेतून मंडळांनी पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय विभागांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कायदा पाळणाऱ्या प्रत्येक मंडळाला पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील; मात्र ध्वनीप्रदूषणासह अन्य नियमांचे जाणूनबुजून उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा ठाम संदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिला.

“गणरायाच्या भक्तीचा आवाज असावा, नागरिकांच्या त्रासाचा नाही. परंपरा जपा, भक्ती जपा, सामाजिक एकोपा जपा; पण दुसऱ्याच्या आरोग्यावर आणि शांततेवर अतिक्रमण करू नका,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here