कौशल्याधिष्टित शिक्षणासह रोजगार निर्मितीवर राज्यशासनाचा भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
26

कौशल्याधिष्टित शिक्षणासह रोजगार निर्मितीवर राज्यशासनाचा भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ८:  विद्यार्थ्यांवर देशाचे भवितव्य अवलंबून असून आजच्या स्पर्धात्मक युगात त्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी कौशल्याधिष्टित शिक्षण घ्यावे, यादृष्टीने कौशल्याधिष्टित शिक्षण आणि रोजगार निर्मितीवर राज्यशासन भर देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव बु. येथे आयोजित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतर सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगर पंचायत मुख्याधिकारी बालाजी लोंढे, प्राचार्य अवधूत जाधवर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजीत तावरे, दत्तात्रय येळे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाज सुधारक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज तसेच महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सावित्रीबाई फुले आणि माळेगाव (बु) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनंतराव पवार असे नावे देण्यात आले आहे.

बारामती येथील पवार घराण्याची सामाजिक कार्याची गौरवशाली परंपरा आणि समृद्ध वारसा आहे. सामाजिक विकासात अनंतराव पवार यांचे मोलाचे योगदान दिले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनंतराव पवार यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या नावाला साजेसे असे काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात यावे. या संस्थेच्या रस्त्यासह आदी पायभूत सुविधे करीता १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. माळेगाव परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे. या मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शिकवण मिळत आहे. तसेच संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

अधिकाधिक युवक-युवतींना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासोबतच रोजगारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याबाबत कार्यक्रम संपन्न झाला. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अतिदुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांना कौशल्याचे शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कुशल, रोजगारक्षम, उद्योगसंपन्न, अर्थसंपन्न विकसित भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याने महत्त्वपूर्ण क्रांतिकारी पाऊल उचललेले आहे.

आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीकरीता दर्जेदार शिक्षण, प्रचंड मेहनत आणि कष्ट घ्या, असा सल्लाही श्री. पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमापूर्वी श्री. पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव (बुद्रुक) या नामफलकाचे आणि छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध आणि सावित्रीबाई फुले महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध या नामफलकाचे अनावरण आभासी पद्धतीने करण्यात आले.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here