केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा आदर्श उपक्रम;राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांनीही घ्यावा धडा …!

0
9

केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा आदर्श उपक्रम;

राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांनीही घ्यावा धडा …!

केज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शाळा प्रशासन आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य असणार आहेत.
आधुनिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन शाळेत लवकरच डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध विषयांतील तज्ज्ञ तसेच निवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी २७ सप्टेंबर रोजी श्री. वसंत हांकारे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य वेळी ओळख व्हावी यासाठी सामान्य ज्ञान वर्ग सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांसारख्या प्रशासकीय पदांचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.
शिक्षणासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील मान्यवर कलाकारांच्या माध्यमातून अभिनय, नाटक, एकांकिका आणि चित्रपट क्षेत्राचे प्रशिक्षण, तर शाळेच्या माजी यशस्वी खेळाडूंकडून कबड्डी व क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासात काही प्रमाणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वाध्याय वर्ग घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांची सातत्याने प्रगती व्हावी यासाठी शिक्षक आणि पालकांच्या नियमित बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावाही घेतला जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळांसाठी दिशादर्शक पाऊल
केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा हा उपक्रम केवळ एका शाळेपुरता मर्यादित न राहता राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांसाठीही आदर्श ठरू शकतो. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि क्षमता असतानाही योग्य मार्गदर्शन व संधींचा अभाव जाणवतो. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, कला-क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद, शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांमध्येही याच धर्तीवर उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शाळा, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक चेहरामोहरा बदलू शकतो. केजच्या शाळेने सुरू केलेला हा उपक्रम त्या दिशेने टाकलेले एक आशादायी आणि प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here