आठवणीतला पाऊस

0
287

गर्भारणी सारखं आभाळ गच्च भरुन आलंय… कधी ही प्रसवेल असं वाटतंय.पण….का पडत नाही तो पूर्वीसारखा खिडकीतून घरांत….थेंब थेंब पाझरत मनात नी… काळजात ही.
मन आणि काळीज ही त्या पावसाच्या थेंबा सारखं आठवणींचा ओलावा ठेऊन जाताहेत अलगद….पण पडत नाही तो पूर्वीसारखा.
पावसाने तरी कां एवढं हट्टी व्हावं हं…..पडावं नं रात्रभर!! आठवणींच्या ओल्या मिठीत …. थेंब थेंब पावसासह ….मंद श्वसात …. झिरपून जावं एकदा तरी.असं मनात येऊन गेलं खूपदा.
कधी कधी खिडक्या तावदानावर,काचांवर, दारांवर, उंबरठ्यावर कोसळून जातो धाडधाड.वेडा पाऊस.ओलीचिंब होउन जाते मग मी ही.त्या आठवणींनी.अगदी वेडीपीशी.
एक मी एक तो …आणि सोबतीला तो वेडा
पाऊस…. जुन्या आठवणींना उजाळा द्यायला पावसाच्या सरी बरसायलाच हव्यात ना!
थेंबासह ओघळणाऱ्या पावसाच्या सरी मनाचा खोल डोह पार हेलावून सोडतात…. हळूहळू मग पाऊस लेखणीतही उतरतो….फडफडणार्या आठवणींना घेऊन अलवार पणे कागदावर विसावतो…. पाऊस राधेचा शाम असतो… बासरीच्या सुरावर धरलेला पैंजणाचा ताल असतो.
तोच अल्लड पाऊस डोंगर माथ्यावर जातो… उंचावरून कोसळतो.झरे वाहते होतात…. नद्या नाचू लागतात….सागराच्या मिठीत वेगाने जाऊन स्थिरावतात…आणि मनातल्या आठवणी ही कातर होतात.काळजापार उतरत जातात.
पावसाच्या स्पर्शाने माती ओली होते.अंगअंग भिजते…मातकट ऋतुगंधाने मग धरा सुगंधित होते.
नुसता पाऊस म्हटला तरी….हातात हात गुंफले जातात.वेड्यागत माणसं आपली होतात.
पण पाऊस वेडाच ना… पडायचं नावच घेत नाही ….अन् कधी पडला तर धो -धो कोसळतो नुसता.लहरी वार्या सारखा….अवखळ बटांनाही मग आवर घालणं कठीण होऊन जातं.
बटांसारखा अवखळ,वार्यासारखा लहरी, मनासारखा चंचल पाऊस…. पडतो कधीतरी खिडकीतून आंत … दारात…..घरात..थेट उरात.
आठवणींच्या गडगडाटासह तुडुंब भरून उरतो पाऊस….मग हळूहळू आसवांच्या रूपाने थेंब थेंब.. बंद पापण्यातून ओघळतो पाऊस.
पाउस पडतो….आभाळातील थेंब खोल खोल मातीत रुजतो.एकरुप होतो.
ओल्या स्पर्शाने हिरवे अंकुर फुटतात…धरा हिरवी होते….ती पिवळी ,लाल ही होते.
.निळी केशरी होते.धरती रंगांनी न्हाऊन जाते.कोण म्हणतं पाण्याला रंग नसतो?
सरसर बरसणारा गुलाबी पाऊस आजही त्याच चाफ्याच्या झाडाखाली…. क्षणभर थबकतांना दिसतो.
म्हणूनच वाटतं की जगताच येत नाही मला आठवणीशिवाय,अन् धरतीला…..पावसाशिवाय !
आठवतंय आजही कागदाच्या होड्या …..पावसात सोडताना अंग अंग भिजावं लागलं होतं.कागदावरची निळी शाई पाण्यात उतरताना निऴंशार पाणी….न्याहळलं होतं.कागदावरची पुसटशी अक्षरं…..आजही ते क्षण गडद करतात.मुठीत गच्च मिटून ठेवलेत ते आनंदाचे. क्षण आणि ओठांवर पावसाची झिम्माड गाणी.
आठवणी कोरड्या ठेवून जगता येतं का कधी?माझंच मला सांगून ही कितीदा झालं होतं.
तो आणि माझा पाऊस इथंच आहेत…. अवतीभवती… आभाळात….मातीत…..आठवणीत… भिजलेल्या मनात… आणि माझ्या शब्दभरल्या ओंजळीत.
आठवणींचा पाऊस
थेंब थेंब ओघळला
तृप्त होऊन कागदावर
शब्द शब्द पाझरला….

©✍🏻 अंजली श्रीवास्तव.
शब्द शिल्प , कृष्णाजी नगर.
करमाळा.जि.सोलापूर.7709464653.
(लेखिका वक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here