“अकरा दिवस भक्तीचे… संतविचारांचे… अन् माणुसकीचे! दिग्गज कीर्तनकारांच्या सेवेतून सजला अनंत युवा प्रतिष्ठानचा गणेशोत्सव; काल्याच्या कीर्तना सह,महाप्रसादाने भक्तिमय सोहळा”

0
3

“अकरा दिवस भक्तीचे… संतविचारांचे… अन् माणुसकीचे! दिग्गज कीर्तनकारांच्या सेवेतून सजला अनंत युवा प्रतिष्ठानचा गणेशोत्सव; काल्याच्या कीर्तनाने,महाप्रसादाने भक्तिमय सांगता”

बारामती : अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने सूर्यनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेश फेस्टिव्हलची काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. गेल्या बारा दिवसांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा ३५०० ते ४००० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.
गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनातून संतवाङ्मय, संस्कार, समाजप्रबोधन आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. आजच्या तरुण पिढीने संतांच्या विचारांशी जोडले जावे, घरातून चांगले संस्कार मिळावेत, योग्य-अयोग्याची जाण निर्माण व्हावी तसेच माणसे व त्यांचा स्वभाव ओळखण्याची दृष्टी विकसित व्हावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


यंदाचा गणेशोत्सव स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला होता. गणेश मंडपात स्व. अजितदादा पवार यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यांच्या कार्याच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबतच भावनिक किनार लाभली.
महाप्रसादासाठी सूर्यनगरी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. एकाच पंगतीत सर्वांनी बसून महाप्रसादाचा लाभ घेतल्याने सामाजिक समता, एकोपा आणि माणुसकीचा संदेश अधोरेखित झाला. महाप्रसाद हा केवळ अन्नदानाचा उपक्रम न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला.
अनंत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भैय्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले. अध्यक्ष, सचिव, खजिनदार, पदाधिकारी, सदस्य तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी बारा दिवस विविध जबाबदाऱ्या पार पाडत उत्सव यशस्वी केला. मंडप व्यवस्था, भाविकांची सोय, धार्मिक कार्यक्रम, पाहुण्यांचे स्वागत आणि विविध उपक्रमांचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले.
अनंत युवा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला यंदा १६ वर्षांची परंपरा पूर्ण झाली. या कालावधीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती, संतविचार, समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याची परंपरा जपण्यात आली आहे.
दरम्यान, बारा दिवसांच्या उत्सवानंतर बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात भाविकांकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवातील धार्मिक कार्यक्रम, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आणि सामाजिक उपक्रमांच्या आठवणी भाविकांच्या मनात कायम राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here