अंधारे-आंधळे व इतरांची मुक्ताफळे…

0
233

अंधारे-आंधळे व इतरांची मुक्ताफळे…

बेइज्जती का जबाब इतनी इज्जत से दो
की सामने वाला खुद जलील हो जाए।
महाराष्ट्रात मोठे वाक्युध्द सुरु असल्याचे जाणवत आहे. राजकीय नेते, साधू-संत व वारकरी संप्रदायातील महिला व पुरुष महाराज तसेच सिने अभिनेते आणि इतरही असे अनेक मोठे लोक जे काही बोलले किंवा बोलत आहेत, ते पाहून व ऐकून आश्चर्य वाटते.
कोणी काय व कसे चुकीचे बोलले याची चर्चा तसेच त्यासाठी माफी मागा, कारवाई करा, अशी मागणी करीत विविध स्तरावरील आंदोलने, निदर्शने, मोर्चे, निवेदने आदी सत्र दोन्ही बाजूने सुरु आहेत. कोण काय बोलले, त्या पाठीमागची भावना, उद्देश, राजकारण, अशांतता आदी सर्व गोष्टी एकमेकांविरुध्द सांगितल्या जात आहे. वास्तविक दोन्ही बाजूचे लोक ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे बोलत आहेत, तर दोन्ही बाजूने असे बोलणे टाळता येऊ शकते, मात्र त्या ऐवजी त्याची ‘री’ ओढण्याचे तसेच परत दुस-यांवर आरोप करणे, असा क्रम सुरु आहे.
प्रातिनिधिक म्हणून दोन ताईंचे व्हिडिओ बघीतले. शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या असलेल्या सुषमाताई अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर माऊली, साधू-संत, श्रीराम, हनुमान व श्रीकृष्ण आदिंच्या बाबतीत व हिंदू संस्कृती विषयी टिंगल टवाळी करुन प्रश्न, शंका उपस्थित करुन केलेले वक्तव्य निषेधार्य आहे. त्यामुळे त्यांचे विरोधात आंदोलने होत आहेत व ‘बंद’ पाळण्यात येत आहे. याचवेळी त्यांचे विरुध्द व्हीडिओ तयार करुन व्हायरल केले जात आहेत. सोशल मीडियावर राष्ट्रीय कीर्तनकार महिला व पुरुषांकडून निषेधाचे, शिवराळ भाषेचे व्हिडिओ पाहता, हे कोणते बरोबर करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो. सुषमाताई अंधारे जे काही बोलल्या त्याचे समर्थन होऊच शकत नाही, मात्र त्यांचे विरोधात बोलतांना गुलाबराव पाटील तसेच राष्ट्रीय कीर्तनकार सौ.सुनिताताई महाराज आंधळे जे बोलल्या त्याचे पण समर्थन करणे चुकीचेच ठरेल.
वास्तविक अंधारेताईंनी हिंदू देवांची व साधू महात्म्यांची नावे टाळणे, त्यांच्यावर बोलूच नये, असे करणे जास्त शहाणपणाचे ठरले असते. त्यांच्या विरोधात बोलणे, प्रेत यात्रा काढणे, बंद पाळणे, निषेध व निदर्शने हे पाहता भावना तीव्र झाल्या आहेत. तेव्हा राजकारण्यांनी बोलतांना आपल्या बोलण्यातून काय ‘मॅसेज’ जाईल याची काळजी घेतलीच पाहिजे, हे पुन्हा एकवेळ अधोरेखीत झाले आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय कीर्तनकार सौ.सुनिताताई महाराज आंधळे यांनी भयंकर शब्दात सुषमाताईचा निषेध केल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे. कीर्तनात एवढी खालची भाषा येऊ शकत नाही म्हणून कीर्तनाबाहेर बोलत असल्याचे सांगून भुंकणारी कुत्री असे १५ वेळा, नालायक ८ वेळा, घुबडी २ वेळा, रेडे, अक्कल, लायकी वगैरे शब्द वापरलेत. तसेच ‘तिच्या पक्षाला मतदान करु नका, निवडणुकीत चमत्कार दाखवू,’ असे सांगून ‘तिच्या बोलण्यावर टाळ्या वाजविणारे बिना बापाचे अवलादी,’ असे म्हटले. वास्तविक सुषमाताई अंधारेचे बोलणे हे शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे आहे का? हे न पाहता, राष्ट्रीय कीर्तनकाराकडून अशा शिव्या व पक्षाला मत देवू नका, असे आवाहन समर्थनीय होऊ शकते का?
एकूणच समाजात थोर पुरुषांचा, महापुरुषांचा तसेच उच्च पदासीन व्यक्तींचा, स्वर्गीय राजकीय नेत्यांचा, स्वातंत्र्य सेनानींचा, जवानांचा व शेतक-यांचा अपमान कोणी कसा केला? हे तेव्हाच नव्हे, तर थोडे उशीरा दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. विशेष म्हणजे केव्हा, कोणाचा अपमान झाला, हे दाखविल्याशिवाय आम जनतेलाही कळत नाही, अशी स्थिती आहे. तर असे करण्याने काय साध्य होते? महापुरुष बदनाम होतात का? त्यांचे महान कार्य छोटे होते का? मग महापुरुषांच्या नावाने अपमानाचे शब्द का व्यक्त होतात, किंवा तसे अर्थ का काढल्या जातात, हे समजून घेतले पाहिजे. यामध्ये एकाने त्या-त्या महापुरुषांचे अनुयायी यांना कळत नकळत दुखावणे व दुस-याने अस्मिता, संस्कृती, धर्मावर हल्ला म्हणून भावना जागृत करीत दुखावलेल्यांना एकत्र करणे, आणि भावनिक राजकारण करणे, हा हेतू असतो का? याचे उत्तर दोन्ही बाजूच्या नेत्यांनाच जास्त माहित असावे. भावनिक अनुयायी मात्र आपला वेळ, पैसा, श्रम देऊन ठगविल्या जातात, त्यांना काय मिळणार? त्यांचा राजकीय वापर होतो, एवढे मात्र खरे।
शेवटी चार ओळी आठवतात…
नेता इस बात को अपमान समझ बैठे,
ये गरीब कैसे खुद को इंसान समझ बैठे?
थोडी बुलंदी क्या मिली इन बादलों को,
पागल खुद को ही आसमान समझ बैठे।

      - - - राजेश राजोरे
       मो.नं. : ९८२२५९३९०३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here