सोमेश्वरच्या रणांगणात ‘दादांचा वारसा’ केंद्रस्थानी; सुनेत्रा पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे समीकरणे बदलली
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता केवळ पॅनेल विरुद्ध पॅनेल राहिलेली नाही; ती अजितदादांनी उभ्या केलेल्या सहकाराच्या वारशावर कुणाचा अधिकार राहणार, याची लढाई बनताना दिसत आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनेलच्या प्रचाराची धुरा जय पवार यांनी हाती घेतली आहे, दुसऱ्या बाजूला कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचे निशाण उभारले आहे, तर युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलनेही स्वतंत्र राजकीय भूमिका घेत मैदानात उडी घेतली आहे.
सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत आता काटे की टक्कर निर्माण झाली आहे. मात्र या संपूर्ण लढतीत सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते सुनेत्रा पवार यांचे आक्रमक राजकीय व्यक्तिमत्त्व.
अजित पवारांच्या निधनानंतरची ही सोमेश्वर कारखान्याची पहिली मोठी निवडणूक. त्यामुळे साहजिकच दादांच्या आठवणी, त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा वारसा आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला सभासदांचा विश्वास हे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत.
‘दादा नाहीत म्हणून कुणीही आपला दावा करू नये’
पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनेल उभे केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली भूमिका या निवडणुकीला वेगळे वळण देणारी ठरली.
“अजितदादा गेले, आता आपल्या पाठीमागे कोण आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर मी इथेच उभी आहे,” या सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.
इतकेच नव्हे तर अजितदादांचा फोटो वापरून मते मागण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, असा थेट संदेश त्यांनी जगतापांना दिला. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच ‘दादांच्या नावाचा वारसा नेमका कुणाचा?’ हा प्रश्न सभासदांच्या चर्चेत आला आहे.
जगताप यांच्याकडून सोमेश्वरच्या उभारणीत आपल्या कुटुंबाच्या योगदानाचा उल्लेख केला जात असताना सुनेत्रा पवार यांनी सहकाराचा मुद्दा पुढे आणला. सहकारी साखर कारखाना ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नसून सभासद शेतकऱ्यांची संस्था आहे, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे.
बारामतीचा कौल ठरणार निर्णायक?
सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील तब्बल १९२ गावांमध्ये पसरले आहे. बारामती तालुक्यात १६ हजार ६२५, पुरंदरमध्ये ८ हजार ९०६, फलटणमध्ये ६५७ आणि खंडाळ्यात १ हजार ५७८ मतदार आहेत.
या आकडेवारीकडे पाहिले तर बारामतीचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता अधिक आहे.
बारामतीतील सभासदांसाठी ही केवळ राजकीय निवडणूक नाही. त्यांच्या ऊसाचा दर, वेळेवर होणारी बिले, कारखान्याचे व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पॅनेल कोणाचे, यापेक्षा ‘कारखाना कोणाच्या हातात सुरक्षित राहील?’ याचा विचार सभासद करणार आहेत.
याच ठिकाणी सुनेत्रा पवार यांची ‘दादांचा वारसा आणि शेतकरी हित’ ही भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जगतापांची बंडखोरी राष्ट्रवादीला किती महागात पडणार?
पुरुषोत्तम जगताप यांनी तेरा वर्षे अध्यक्षपद सांभाळल्याचा अनुभव पुढे करत स्वतःची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. अजितदादांचा विश्वास असल्यामुळेच आपल्याला एवढी वर्षे कारखान्याची जबाबदारी मिळाली, असा त्यांचा प्रचार आहे.
त्याचबरोबर पॅनेलच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी झाल्याचा दावा जगताप गटाकडून केला जात आहे.
मात्र दुसरीकडे ‘दादांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच बंड केले’, अशी भावनिक भावना काही सभासदांमध्ये निर्माण होत असल्याची चर्चा आहे. ही भावना मतदानाच्या दिवशी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
युगेंद्र पवारांचा वेगळा डाव
या दोन गटांच्या संघर्षापासून काहीसे अंतर ठेवत युगेंद्र पवार यांनी सकारात्मक प्रचाराची भूमिका घेतली आहे. मात्र प्रचाराच्या शुभारंभ सभेत त्यांनी सत्ताधारी दोन्ही पॅनेलवर मिश्किल शैलीत निशाणा साधला.
“किटलीशिवाय कप-बशी भरत नाही; शिट्टी बघितली की सावध व्हा… अरे भाजप आलं!” या त्यांच्या वक्तव्याने निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला.
युगेंद्र पवार यांच्या प्रचारात मात्र शरद पवारांचा अनुभव आणि अजित पवारांच्या कामाची सांगड घालण्याचा प्रयत्न दिसतो. सोमेश्वरच्या उभारणीपासून कारखान्याच्या अडचणी सोडवण्यापर्यंत पवार कुटुंबाच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी ‘पवार साहेबांचे लक्ष पुन्हा कारखान्याकडे असावे’, अशी भूमिका मांडली आहे.
‘दादांचा शब्द’ आता कोण चालवणार?
सोमेश्वरची ही निवडणूक एका मोठ्या राजकीय प्रश्नाचे उत्तरही शोधत आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये पक्ष संघटनेवर त्यांचे मजबूत नियंत्रण होते. नाराज असो वा इच्छुक—दादांचा एक फोन आणि कार्यकर्ते पुन्हा कामाला लागत, अशी त्यांची कार्यशैली होती.
२०२१च्या सोमेश्वर निवडणुकीतही नाराज मंडळींना त्यांनी जाहीरपणे सुनावले होते. त्यांच्या एका शब्दाला कार्यकर्त्यांमध्ये वजन होते.
आता दादा नाहीत. मग तो शब्द कोणाचा चालणार?
याच प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे.
‘सुनेत्रा पवार फॅक्टर’ किती प्रभावी ठरणार?
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा राजकीय वावर यापूर्वी प्रामुख्याने भावनिक स्वरूपाचा दिसत होता. मात्र सोमेश्वरच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही केवळ प्रचाराची भूमिका नसून दादांच्या राजकीय वारशाचे संरक्षण करण्याचा संदेश म्हणून पाहिली जात आहे.
त्यामुळे या निवडणुकीत जय पवार यांच्या प्रचारापेक्षा सुनेत्रा पवारांनी उभा केलेला भावनिक आणि राजकीय मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
दादांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना थेट आव्हान देताना त्यांनी ‘वारसा हा नावाने नाही, कामाने सिद्ध करावा लागतो’, असा संदेश दिला आहे.
आता सभासदांसमोर तीन पर्याय आहेत—
अधिकृत राष्ट्रवादीचा पॅनेल, बंडखोर जगतापांचे पॅनेल आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल.
मात्र खरा प्रश्न एकच आहे—
सोमेश्वरचा कारखाना कुणाच्या ताब्यात राहणार आणि अजितदादांनी उभ्या केलेल्या सहकाराच्या वारशावर सभासद कोणाचा शिक्का मारणार?
११ ऑक्टोबरला होणारे मतदान त्याचे उत्तर देईल. सध्या मात्र सोमेश्वरच्या राजकीय रणांगणात सुनेत्रा पवारांच्या आक्रमक भूमिकेने लढतीचे गणित निश्चितच बदलले आहे.




