‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृती
बारामती, दि.६: महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, अवयवदान आणि रक्तदान यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी व सेवाभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या वतीने महिला आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच समुपदेशन करण्यात आले. महिलांना आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील स्वच्छता आणि विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा १४० महिलांनी लाभ घेतला. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान भूशास्त्र विभागाच्या वतीने वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी अवयवदान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. अवयवदानाचे महत्त्व, गरज, प्रक्रिया तसेच अवयवदानाबाबत असलेले गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमानंतर वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांनी अवयवदानाची शपथ घेतली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत रक्तदानाबाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. तर इंदापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या माध्यमातून नियमित रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. रक्तसंकलन व संबंधित वैद्यकीय प्रक्रियेसाठी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. नाकते यांचे मार्गदर्शन व समन्वय लाभला.
विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे नियोजन व देखरेख जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आली.
०००




