संविधान रडतंय…

0
21

संविधान रडतंय…

कोणी केला बलात्कार ?
कोणी दिला त्रास?
तू कशी होती..
तू अशी नव्हती!
एक नाही अनेक
बोललं जातय डॉ.ताई तुझ्या बद्दल
पण…
तुझ्या मरणाचं खरं कारण
व्यवस्थेशी निगडित आहे
हे न कळण्या इतपत कोणी वेडं नाही…
टाकलेल्या दबावाखाली
तुझं मरण केव्हाच चिरडून
टाकलंय… व्यवस्थेनं
तू ज्या हातावर कारण लिहिलं
आयुष्याच्या शेवटाचं
ताई…
त्याच हातानं बोट धरून चालली
होतीस न
तुझ्या थकलेल्या बापाचा हात
आणि त्याच हातानं गं
तू कितीतरी जणांना दिलंस जीवनदान..
आवाज उठवायचा नसतो बाईनं
न्यायासाठी पाचदहा पानी तक्रार ही करायची नसते तिनं
नाहीतर ती अशीच मारली जाते
दबली जाते,
दाबली जाते,
किंवा जाळली जाते…
आणि म्हणूनच
चिणला जातोय आवाज तुझा..
ओरड किती ओरडायचय तुला
आम्ही आहोतच..
मेल्यानंतर ही तुझ्यावर बलात्कार करणारे…
आणि
३७५,३०६,की ३०२ नक्की कारण
कधी समजेल ?

जगात नव्हे त्रिलोकात तुझे हात सुंदर असावेत ,
तू सुरक्षित असावीस म्हणून ..
संविधानानं कवच दिलं होतं तुला
सावित्रीबाईनं लेखणी दिली होती
पण डॉक्टर ताई…
त्या देखण्या हातावर तू तुझा असा शेवट लिहीलास..

बघ ताई ,
कसं रडतंय ढसाढसा आपलं संविधान ..
आणि हुंदका ही ऐकू येतोय भिडे वाड्यातून
केव्हाचा…
रायगडाचा एकेक चिरा छाती बडवून ओरडून सांगतोय..
हा माझा महाराष्ट्र नव्हे
हा माझा महाराष्ट्र नव्हे
ऐकतेस ना ताई!!

©️अंजली राठोड करमाळा
७७०९४६४६५३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here