श्रीराम सारखे वागणे हीच रामाची खरी पूजा…
राम तो घर-घर में हैं,
राम हर आंगन में हैं।
मन से रावण जो निकाले,
राम उसके मन में हैं…
देशभरात रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून गुरुवारी श्रीराम नवमी आहे. अर्थात हिंदू धर्मशास्त्रानुसार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मदिवस. चैत्र नवरात्रीच्या समारोपाचाही हा दिवस. देशभरात मोठ्या उत्साहाने जल्लोषाने यंदा राम नवमी साजरी होणार आहे. या दिवशी उपवास, पूजन, शोभायात्रा, बाईक रॅली, जिवंत देखावे, आरती, नदी स्नान, काही नविन राममंदिरचे निर्माण, रामलल्लाच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा, रोषनाई, आतषबाजी, आदी बाबीही केल्या जाणार आहे. हे सर्व चांगलेच आहे. परंतु या अनुषंगाने श्रीराम यांच्या विचारांचा अंगीकार किती लोक करणार? श्रीरामाचे चरित्र किती लोक समजून घेणार, श्रीरामाचा कशाचा आदर्श घेणार? ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तर आपण कोणत्या मर्यादा पाळणार? असे अनेक प्रश्नांवर आत्मचिंतन होणे गरजेचे वाटते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रामुख्याने तीन देवांनी भारत व्यापला आहे. पहिले देव शिव, दुसरे श्रीकृष्ण आणि तीसरे प्रभू श्रीराम. यामधील ‘शिव’ आणि ‘श्रीकृष्ण’ हे दोन देव पुजनासाठी आहे. त्यांच्या ‘लिला’ प्रमाणे आपण आयुष्यात वागू शकत नाही. कल्याणकारी ‘शिव’ सारखे प्रताप आणि विष प्राशन करु शकत नाही तर श्रीकृष्णासारखी महाभारतमधील भूमिका प्रमाणे कार्य करु शकत नाही. म्हणून हे दोन देव पुजनासाठी मानले जातात. तर श्रीरामांची वडिलांप्रती भक्ती, आदर व आज्ञा पाळण्याचा निर्धार, भावांप्रती प्रेम तसेच आदर्श पती, आदर्श राजा असे खूप काही घेण्यासारखे असल्याने श्रीरामाचे अनुकरण करावे, असे सांगण्यात आले आहे. श्रीरामाचे अनुकरण आणि तसे वागणे हीच श्रीरामांची खरी पुजा करणे होय, असे संत महात्म्यांकडून सांगण्यात आले आहे.
प्रत्यक्षात भगवान श्रीरामांकडून अर्थात त्यांच्या चरित्रातून, रामायणमधून प्रेरणा घेऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न सर्वांनी केला तर समस्या सुटतात. भावबंदकीचे कोर्टातील भांडणे, ज्येष्ठांचे वृध्दाश्रमात राहणे, असे करणार्यांना श्रीरामाचा फोटो लावण्याचा व पुजनाचा नैतिक अधिकार नाही. त्यांची दुटप्पी भूमिका टिकेची ठरली पाहिजे. अलीकडच्या काळात श्रीराम कथा किंवा रामायणचे आयोजन करणे खूप महाग झाले आहे. ‘अपने अपने श्रीराम’ ‘विश्वासाने’ सांगण्यासाठी दररोजचे सुमारे ३० लाखाचे मानधन कविवर्य मागतात, तेव्हा श्रीरामाच्या नावावर होणारा एकूण व्यवसाय पाहता तसेच शहरी लोकांकडून आई-वडिलांना वृध्दाश्रमात पाठविण्याचे बहुतांश प्रकार पाहता शहरवासीयांनी प्रामुख्यांनी ‘श्रीराम मांडले’, आणि ग्रामिणांनी काही अंशी का होईना ‘श्रीराम मानले’, असे म्हणता येईल.
वास्तविक देशाला श्रीराम चरित्र समजून घेण्याची खरी गरज आहे. कौटुंबिक वाद, हिंसाचार, गैरप्रकार आदी अनेक समस्या श्रीरामाच्या आदर्शाचे पालन केल्याने सुटू शकतात. मात्र या अलीकडे ‘राम’ न होता, ‘रावण’ होण्याकडे कल आहे. तसे ते सोपेही आहे. त्यामुळेच रावणरुपी विकाराने व अहंकाराने अनेकांना पछाडले आहे. दरवर्षी ‘रावण’ दहनाने आतील रावण मरत नसून तो अधिक विकृत होत असल्याची सामाजिक स्थिती आहे. तेव्हा रामाची शिकवण व तसे वागणे खूप गरजेचे ठरते. यासाठी फक्त भव्य राम मंदिराचे निर्माण पुरेसे नसून श्रीराम चरित्राचा अभ्यास, रामायणचे वाचन व कालबध्द अभ्यास कार्यक्रमाची गरज आहे. रामायण हा धर्मग्रंथ कालबाह्य नसून प्रेम, त्याग, राजधर्म, आदर्श, मर्यादा, आदर्श शत्रुत्व, आज्ञा पालन, कर्तव्यनिष्ठा, गुरुंचा आदर करणे, सत्याचे मार्गावर चालणे आदी नितीमुल्ये शिकण्यासाठी आजही गरजेचा आहे. काही रामायण अभ्यासकांकडून हेच मांडण्यात येत आहे. मात्र समाज बदलण्यासाठी एवढे पुरेसे नाही. कारण आज काहींना रामायण व्यवहार्य वाटत नाही. उलट रामाप्रमाणे आता कोणी जगुच शकत नाही, कारण कोणीही एवढे सहनशील, धैर्यवान नाही म्हणून तसे जगत नाही, काळ बदलला, असे बोलून मोकळे होण्यातच धन्यता मानली जाते.
वास्तविक दुष्ट शक्तिवर सद्गुण, सद्विचार, सहनशिलता आणि आत्मविश्वास, मैत्री या सर्व गुणांनी विजय मिळविता येतो. वाईटला वाईटने उत्तर देणे गरजेचे नसते, त्यामुळे आपला चांगुलपणा सोडू नये, हेच श्रीराम त्यांच्या वागणुकीतून शिकता येते. तर हेच शाश्वत असल्याचे सिध्द झाले आहे.
शेवटी श्रीराम चरित्र ग्रंथ व ‘रामायण’ला फक्त एक धर्मग्रंथ मानून पुजा करण्याचे पलीकडे उच्च कोटीचा अभ्यास ग्रंथ मानला पाहिजे. या आशयाच्या ओळी आठवतात…
रामायण मानव से महामानव बनने की सीख देता है,
असुविधाओं में रहकर भी एक इंसान पूरी दुनिया को जीत लेता हैं!
– – – राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com