विधानसभा निवडणूक मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

0
25

विधानसभा निवडणूक मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १२: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहील.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात सवलत देण्यात येते. मात्र, काही आस्थापना, संस्था भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले असून सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here