माळेगाव साखर कारखाना निवडणूक: राजकीय समीकरणे बदलणार?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्यता असून, निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सत्ताधारी गटाने गटनिहाय बैठका सुरू केल्या असताना, विरोधी गट मात्र शांत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य तथा माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे अजित पवार गटाविरोधात भूमिका घेणार का, यावर अजूनही संभ्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीसाठी सज्ज होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कष्टकरी शेतकरी समिती देखील निवडणुकीत सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.
सध्याच्या राजकीय स्थितीनुसार, या निवडणुकीत विविध पॅनल निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेतृत्व चेअरमन केशवराव जगताप आणि माजी चेअरमन बाळासाहेब तावरे करीत असून, त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे.
यावेळी चंद्रराव तावरे -रंजन तावरे जोडी अजित पवारांसोबत जाणार का, की स्वतंत्र लढत देणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याआधी कारखान्याच्या निवडणुका पक्षविरहित लढवल्या गेल्या असल्या तरी, यावेळी वेगळे समीकरण जुळण्याची शक्यता आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, सभासदांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

