मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला…

0
135

दि. 3 ऑगस्ट 2023.
मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला
—उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कवीवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या
सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी

कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने
पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला
—उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 3 :- “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं.

निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते.

शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे.

महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here