विशेष लेख-
दि.७ जून २०२३

0
216

बियाणे, खते खरेदी करताना अशी घ्यावयाची काळजी

कृषि क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग सतत प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी अनेक उपाययोजना कृषि विभागामार्फत केल्या जातात. उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बियाणांमुळे उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होते. तर खते पिकांना पोषकतत्वांचा योग्य पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके खरेदी व फवारणी करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया...


उत्पादन वाढीसाठी बियाणे, खते याबरोबरच किटकनाशकेही तितकीच महत्त्वाची आहेत. किटकनाशकांमुळे विविध कीडरोगांपासून संरक्षण होऊन उत्पादकता सुरक्षित ठेवण्यास मदत होते. निविष्ठांच्या उत्पादन, विक्री, वितरण, साठवणूक व वाहतूक आदी गुणवत्ता नियंत्रणासाठी विविध कायदे आहेत. पीकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती निविष्ठा खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

गुणवत्ता व दर्जाची खात्री आवश्यक

गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे व खते खरेदीस प्राधान्य द्यावे. पावतीसह खरेदी केल्यास बनावट व भेसळयुक्त बियाणे असण्याचा धोका टाळता येतो. पावतीवर बियाण्यांचा, खतांचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, खरेदीदाराचे पूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव नमूद असल्याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे, खते पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची, खतांची पाकीटे सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. तसेच पाकीटांवरील अंतिम मुदत तपासून घ्यावी.

खरेदी केलेली बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. बियाण्याची निवड ही जमीन व ओलीताची साधने लक्षात घेऊन करावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी

किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत. किटकनाशकाला हुंगणे किंवा वास घेणे टाळावे. तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा. मिश्रण हाताने न ढवळता लांब दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा. फवारणी करताना लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्याठिकाणापासून दूर ठेवावे. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या नष्ट कराव्यात. किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये. शिल्लक राहिलेले द्रावण तयार केल्याच्या २४ तासानंतर वापरु नये. कडक उन्हात किंवा जोरदार वाऱ्याच्या परिस्थितीत तसेच पाऊस पडण्यापूर्वी अथवा पाऊस पडल्यानंतर लगेच फवारणी करु नये.

केंद्र शासनाने अनुदान वितरणाच्या पद्धतीत बदल करुन अनुदान खत विक्रीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणेबाबत थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प संपूर्ण राज्यात १ नोव्हेंबर २०१७ पासून सुरु केला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्याने त्याचा बोटाचा ठसा मशीनवर ठेवावयाचा आहे व त्याचा आधार नंबर विक्रेत्याने मशीनवर नोंद केल्यास त्याची ओळख नोंद होते किंवा आधार क्रमांक मशीनवर नोंदवल्यास लाभार्थ्याच्या मोबाईलवर ओटीपी जाऊन त्याची नोंद केल्यास जी खते खरेदी करावयाची आहेत, त्याचे देयक तयार होते. त्याची रक्कम अदा करुन शेतकऱ्याना खते खरेदी करता येतात.

कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडवण्यासाठी तसेच अन्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० वर संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल अथवा एसएमएसद्वारे नोंदवून शासनाच्या गतिमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे.

-विभागीय माहिती कार्यालय,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here