बारामतीतील विद्यार्थी, पालकांना पुण्यातील युवा महोत्सवासाठी मोफत बससेवा

0
3

बारामतीतील विद्यार्थी, पालकांना पुण्यातील युवा महोत्सवासाठी मोफत बससेवा

बारामती पालक संघ आणि रोटरी रोटरॅक्ट क्लबचा उपक्रम; २२ नोव्हेंबर रोजी बसची व्यवस्था

बारामती : बारामतीतील विद्यार्थी आणि पालकांना करिअरच्या विविध संधींची माहिती मिळावी, तसेच त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांची ओळख व्हावी, या उद्देशाने बारामती पालक संघ आणि रोटरी रोटरॅक्ट क्लब यांच्या वतीने पुणे येथे आयोजित युवा महोत्सवाला जाण्यासाठी मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी रोटरी रोटरॅक्ट युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हॅकाथॉन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), करिअर मेळावा, डीआरडीओ व भारतीय लष्कर, विमानचालन, ड्रोन तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. याशिवाय स्टार्टअप झोन तसेच विविध कला प्रकारांची माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
बदलत्या काळानुसार करिअरच्या नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील वाटचाल समजून घेण्यासाठी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवडीसाठी मार्गदर्शन आणि महत्त्वपूर्ण माहिती या माध्यमातून मिळू शकणार आहे.
या महोत्सवाला बारामतीतील विद्यार्थी आणि पालकांना सहभागी होता यावे, यासाठी दि. २२ नोव्हेंबर रोजी बारामती येथून पुण्याला जाण्यासाठी तसेच पुण्याहून बारामतीला परत येण्यासाठी रोटरी रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी बारामतीतील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बससेवेसाठी इच्छुकांनी रोटरी रोटरॅक्ट क्लब तसेच बारामती पालक संघाचे राजेश कांबळे, प्रमोद मोरे आणि रविकिरण खारतोडे यांच्याकडे नावनोंदणी करावी.

Previous articleकार्यकर्तृत्वाचा आधारवड हरपला!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here