बारामतीत शेतकऱ्यांचा मेळा की भविष्याची झलक? कृषी प्रदर्शनाने सगळ्यांनाच केलं थक्क!
“शेती आता फक्त मातीपुरती राहिली नाही!” हे वाक्य बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात पाऊल टाकताच पटतं. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार दि. १८ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी अक्षरशः गर्दीचा उच्चांक गाठला.
सकाळी आठ वाजताच ट्रॅक्टर, जीप, दुचाक्या, खासगी गाड्यांतून शेतकरी येऊ लागले आणि पाहता पाहता प्रदर्शन परिसर गजबजून गेला. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, हरियाणा अशा राज्यांतून आलेले शेतकरी एकमेकांना विचारत होते — “अरे, ऊस एआयवर वाढतो म्हणे, कुठंय तो स्टॉल?”
मातीविना शेती, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळपिकं, एकखोडी डाळिंब-पेरू, परदेशी भाजीपाला पाहून अनेक शेतकरी म्हणत होते, “आपली शेती आता थेट परदेशात पोचली!”
पण सगळ्यात जास्त आकर्षण ठरलं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ऊस शेती. उसाच्या विविध जाती, वाढीची पद्धत आणि एआय तंत्रज्ञानाचं जादूई काम पाहण्यासाठी या दालनात पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी थेट नाव नोंदणी करत “आम्हीही हा प्रयोग करणार” असा निर्धार केला.
प्रदर्शनात कृषी विज्ञान केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांची माहिती घेत शेतकरी नव्या शेतीकडे वळताना दिसून आले. विविध कंपन्यांचे स्टॉल, सुधारित बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे प्रदर्शन म्हणजे जणू शेतीचा महाकुंभच वाटत होता.

याच प्रदर्शनात ट्रस्टचे विश्वस्त मा. श्री. रणजीत अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक भीमथडी अश्व प्रदर्शन पार पडलं. आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण परंपरा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
महाराष्ट्र राज्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे अवर सचिव मा. डॉ. ललित कुमार धायगुडे यांनी प्रदर्शनाला भेट देत उपक्रमाचं कौतुक केलं. तर ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र दादा पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे हे स्वतः मैदानात फिरून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत होते.



हे कृषी प्रदर्शन शनिवार दि. २४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, “एकदा तरी बघाच, शेतीचं भविष्य डोळ्यांसमोर दिसेल,” असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी केलं आहे.




