
बारामतीत जळगाव क.प. येथे अजितदादांच्या वाढदिवसाचा आगळा ‘गोसेवा उत्सव’
बारामती | 27 जुलै 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात कर्तृत्वाचे दुसरे नाव असलेल्या मा. अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत एक आगळा-वेगळा, श्रद्धा आणि संकल्पांनी भरलेला गोसेवा उत्सव पार पडला.
या उत्सवाचे आयोजन कामधेनु गो सेवा संघ, श्रीमती प्रेमलता शातीलाल मेहता यांच्या जळगाव क.प. येथील गोशाळेत करण्यात आले होते. विशेष म्हणजे बारामतीचे गोप्रेमी मित्रपरिवार, श्रीकांत कोरे आणि लक्ष्मण मोरे यांच्या पुढाकाराने हा सोहळा केवळ पूजाअर्चेपुरता मर्यादित न राहता, 66 पोती गोळी, भुसा व चारा गोमातेला अर्पण करत अजितदादांच्या दीर्घायुष्याचा आणि भावी मुख्यमंत्रीपदाचा संकल्प करण्यात आला.


‘रीतीका’ नावाच्या गोमातेला फुलांनी सजवून तिची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. या पूजनात दादांना मुख्यमंत्री बनविण्याची संकल्पपूर्ती व्हावी, असा साकड ही घालण्यात आला. या पूजेला राजकीय संकल्पाच्या अधिष्ठानाचे रूप मिळाले. याचे विशेष आकर्षण म्हणजे — अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर, हीच ‘रीतीका गाय’ त्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे!
या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी गोसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. यामध्ये सुनीलशेठ मेहता, मिश्रीलाल टाटीया, पाषाभाई मुकादम, विठ्ठल नेवशे, संजय भिले, डॉ. सिसोदीया, संदीप बनकर, संदीप कुलकर्णी (हॉटेल लीलाज) आणि संदीप आहेर यांचा विशेष सहभाग होता.

अशा उपक्रमातून केवळ एक व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत नाही, तर महाराष्ट्राच्या भावी नेतृत्वासाठी श्रद्धेचा आणि विकासदृष्टीचा मार्गही आखला जातो. ‘गोमातेचा आशीर्वाद आणि जनतेची ताकद’ या दोन स्तंभांवर आधारलेली ही संकल्पना, भविष्यात मा. अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील, या आशेचा मंत्र घेऊन पुढे जात आहे.