बारामतीत छोट्या वृत्तपत्रांची गळचेपी? स्थानिक संपादक पत्रकारांमध्ये नाराजी वाढली…!
बारामती व परिसरात स्थानिक राजकारणाच्या छायेत छोट्या वृत्तपत्रांना दुजाभाव दिला जात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा सक्रिय होताच काही ठराविक लोकांकडेच जाहिरात आणि प्रसिद्धीचे कारभार केंद्रीत होत असल्याचा आरोप स्थानिक संपादक व पत्रकारांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही निवडक वृत्तपत्रांना जास्त दराने जाहिराती दिल्या जातात, तर इतर छोट्या वृत्तपत्रांचे दर मनमानी पद्धतीने कमी ठेवले जातात. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून त्यामुळे छोट्या माध्यमांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, पत्रकारांमध्ये एकोपा अभावी व सक्षम संघटनांची कमतरता असल्यामुळे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागातही स्थानिक पत्रकारांना कोणतेही ठोस अनुदान किंवा सुविधा मिळत नसल्याचीही नाराजी आहे.
काही मोजक्या लोकांकडेच माध्यमांची जवळीक राहिल्याने राजकीय फायद्यासाठी वृत्तपत्रांचा वापर होत असल्याचा आरोपही केला जात आहे. यामुळे प्रामाणिकपणे काम करणारे, सामाजिक व विकासात्मक पत्रकारितेला वाहून घेतलेले पत्रकार मागे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवर याबाबत तीव्र नाराजी असून अनेक पत्रकार व संपादक आपापसात ही भावना व्यक्त करत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी लक्ष देऊन स्थानिक संपादक व पत्रकारांना न्याय देण्याची अपेक्षा धरत आहे…!



