बारामतीत कृषिक २०२६ ची ऐतिहासिक सांगता
शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद, ८ दिवसांत विक्रमी सहभाग…
बारामती | दि. २४ जानेवारी २०२६
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “कृषिक २०२६” या प्रात्यक्षिके आधारित भव्य कृषी प्रदर्शनाचा आज शनिवारी दिमाखदार आणि ऐतिहासिक समारोप झाला. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. मातीशी नाळ जोडलेल्या या कृषी महोत्सवाने तब्बल ८ दिवसांत विक्रमी शेतकरी सहभागाचा उच्चांक प्रस्थापित केला.
प्रदर्शनाच्या समारोपदिनी खासदार (राज्यसभा) सौ. सुनेत्रा पवार व सौ. सुनंदाताई पवार यांनी प्रदर्शनास सविस्तर भेट देत विविध स्टॉल्स, प्रात्यक्षिके व पशुपक्षी विभागाची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन व्यवस्था व कृषी नवकल्पनांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या कंपन्या व संस्थांचा ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार व उद्योजक विश्वजित वाबळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व संस्थेचे प्रतीक रोप देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये जैन एरिगेशन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रतिभा बायोटेक, आरडोअर सीड्स, नेचर डीलाईट, राइज एन शाईन, अग्रोस्टार, आत्मा, जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आदी मान्यवर कंपन्या व संस्थांचा समावेश होता.
दरम्यान, अप्पासाहेब पवार पशु-पक्षी प्रदर्शनांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण . राजेंद्र दादा पवार व विश्वस्त राजीव देशपांडे यांच्या हस्ते पार पडले.
HF कालवड स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक: प्रदीप पाटील, निमगाव (ता. माढा, जि. सोलापूर) – ₹३१,०००/- व ट्रॉफी
द्वितीय क्रमांक: योगेश टाव्हरे, आंबेगाव (पुणे) – ₹२१,०००/- व ट्रॉफी
तृतीय क्रमांक: गणेश टाव्हरे, आंबेगाव (पुणे) – ₹११,०००/- व ट्रॉफी
तसेच देशी गाय स्पर्धेत श्री. देविदास नरवटे (अहमदपूर, जि. लातूर), देशी वळू स्पर्धेत संतोष कोकणे (नंदादेवी, ता. दौंड) आणि संकरित वळू स्पर्धेत चंद्रकांत आटोळे (खातगाव, ता. कर्जत) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कृषिक २०२६ हे प्रदर्शन नाविन्यपूर्ण संकल्पना, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शनामुळे विशेष ठरले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी सर्व सहभागी कंपन्या, स्टॉलधारक, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक व सहभागी शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच कृषिक २०२७ साठी शुभेच्छा दिल्या.
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित हे ८ दिवसांचे ऐतिहासिक कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या स्मरणात कायम राहणारे ठरले.




