बारामतीत काळ्या काचांच्या वाहनांवर वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई..
बारामती वाहतूक शाखेची कारवाई; दोन महिन्यात १२५ वाहनांना १,२४,५०० रुपयांचा दंड
वाहतूक पोलिसांनी स्वतःच काढल्या काढल्या फिल्म..
बारामती ता.२२
वाहणांना काळ्या फिल्म लावून अनेक उद्देशांनी गाडी आतून झाकून ठेवणाऱ्या वाहन चालकांना बारामती वाहतूक शाखेने चांगलाच दणका दिला आहे. १२५ वाहनांवर दंड करत काळ्या काचांचे ब्लॅक फिल्मींग वाहतूक पोलीस काढून कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
दोन दिवसीय विशेष मोहीम राबवून वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या कारवाईत अनेकांना वाहतूक नियमांचे महत्व पटले आहे. काळ्या काचा करणाऱ्या १२५ जणांना वाहनांना १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
मार्च महिन्यात काळ्या काचेचे ३३ वाहणावर कारवाई करण्यात आली असून ३१ हजार ५०० तर एप्रिल महिन्यात ६३ प्रकरणांमधून ६६ हजार ५०० तर मे महिन्यात १८ मे पर्यंत २९ जणांवर कारवाई करून २६ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त २ दिवसात विना क्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट्स, अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपल बसून टुकार गिरी करणे, पोलिसांचे आदेश न पाळता निघून जाणे अशा १४५ वाहनांवर सुद्धा कारवाई करून ९३ हजार ४०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
काळ्या काचा करून गाडीत कोणत्याही कामासाठी दुरुपयोग होऊ शकतो, अवैध पदार्थांची वाहतूक होऊ शकते त्यामुळे नियमभंग करणाऱ्या अनेकांची गय न करता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाहनांच्या पुढील बाजूची आणि पाठीमागची काच ७० टक्के आणि बाजूच्या काचा किमान ५० टक्के पारदर्शक असाव्यात असा केंद्रीय मोटर वाहन अधिनियमात नियम १०० नुसार बंधनकारक आहे. काचांवर कोणत्याही प्रकारच्या काळ्या फिल्म्स अथवा इतर पदार्थ लावू नये, लावल्यास पोलिसांनी अथवा संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्या काढून टाकाव्यात, असे शासनाचे आदेश आहेत. परंतु अनेकांकडून नियमांची पायमल्ली होते. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा काळ्या काचा करण्याकडे जास्त कल आहे हे आढळून आले आहे. बारामती वाहतूक पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. विशेष म्हणजे आर्थिक दंड करूनही काहीजण काचांवरील फिल्म्स काढत नाहीत अशावेळी स्वतः पोलीसांनी या फिल्स काढण्याची कारवाई हाती घेतली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव वाहतूक शाखा पोलीस अंमलदार अशोक झगडे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, प्रकाश चव्हाण, सिमा साबळे, सविता धुमाळ, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, माया निगडे, सुभाष काळे, योगेश कांबळे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, योगेश कांबळे यांनी केली.
तर अशांवर होणार कारवाई!
गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वाहणांच्या काचा काळ्या करण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार पुढे येत आहेत.अनेकवेळा अमली पदार्थांची चोरटी वाहतूक, अपहरण, चोरीसारख्या घटनामध्ये तसेच इतर गुन्हेगारी घटनांमध्ये काळ्या काचेची वाहने वापरण्यात येतात.त्यामुळे अशी वाहने आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
असे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेले आहे.