बारामतीत अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल
बारामती (14 मार्च 2025): बारामती शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बारामती नगरपरिषदेचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र ज्ञानदेव शिंदे (वय 58) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील ग्रामीण गट क्रमांक 209/5/अ-1, जुना झोन नं. 10-4, घर नं. 723 लगत श्री. अर्जुन चंद्रकांत हंगे (रा. जुना मोरगावरोड, बारामती) यांनी अनधिकृत आर.सी.सी. बांधकाम केले आहे. हे बांधकाम पुर्व-पश्चिम 50 फूट, दक्षिणोत्तर 24 फूट असून अंदाजे 40 फूट उंचीचे आहे.
नगरपरिषदेने संबंधितांना वेळोवेळी बांधकाम थांबवण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 अंतर्गत नोटीस बजावल्या होत्या. मात्र, नोटीस देऊनही बांधकाम सुरूच राहिल्याने 14 मार्च 2025 रोजी दुपारी 2:24 वाजता पोलिस स्टेशन डायरी क्रमांक 31/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सोनवणे (ब. नं. 3291) यांच्या मार्गदर्शनाखाली सफौज मोरे करत आहेत.
— बारामती अपडेट्स
