बारामती सहकारी बँकेच्या ६५व्या वार्षिक सभेत १० टक्के लाभांशाला मंजुरी

0
5

बारामती सहकारी बँकेच्या ६५व्या वार्षिक सभेत १० टक्के लाभांशाला मंजुरी

बँकेच्या ठेवी २,२८७ कोटींवर; निव्वळ नफा १५.४८ कोटी रुपये

बारामती : बारामती सहकारी बँकेची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी राजमाता जिजाऊ सभागृह, बारामती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्र राज्याच्या माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना तसेच अहवाल सालातील दिवंगत मान्यवरांना सभेच्या प्रारंभी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा.ना. सुनित्रावहिनी अजितदादा पवार होत्या.
बँकेचे अध्यक्ष अॅड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा सादर केला. अहवाल वर्षअखेरीस बँकेच्या ठेवी २,२८७ कोटी रुपये, तर कर्जवाटप १,४११ कोटी रुपये झाले असून बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७.७८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात बँकेच्या ३६ शाखा व एका विस्तारित कक्षाद्वारे ग्राहकांना सेवा दिली जात आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एनपीए व इतर तरतुदी वजा केल्यानंतर बँकेला १५.४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असल्याचेही सभेत सांगण्यात आले.
१० टक्के लाभांशाला मंजुरी
सभासदांना यापूर्वीच्या ८ टक्क्यांऐवजी १० टक्के लाभांश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी सूचना सुनित्रावहिनी पवार यांनी केली. संचालक मंडळाने ही सूचना मान्य करून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यास मंजुरी दिली. या निर्णयाचे सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. लाभांशाची रक्कम तत्काळ सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आली.
डिजिटल बँकिंगवर भर; नव्या शाखांचा विस्तार
बँकेकडून ग्राहकांना यूपीआय, क्यूआर कोड बॉक्स, आरटीजीएस, एनईएफटी, ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पॅनकार्ड, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट, विमा सेवा तसेच वीज बिल भरणा आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादाचा विचार करून लवकरच आणखी पाच नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे शाखांचा समावेश आहे.
बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विस्तारण्याबरोबरच बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. आगामी अहवाल वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि एकूण व्यवसायात वाढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक विनोद रावळ यांनी विषयपत्रिका वाचून आणि बँकेचा अहवाल सादर करून सुरू केले. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. बँकेच्या कामकाजाबद्दल अनेक सभासदांनी समाधान व्यक्त करत सूचना मांडल्या. त्यावर बँकेचे अध्यक्ष अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले.
सभेला संबोधित करताना सुनित्रावहिनी पवार यांनी बँकेच्या मागील पाच वर्षांतील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. सहकाराची वटवृक्षासारखी परंपरा पुढे नेण्याचे आवाहन करताना गरजू ग्राहकांना कर्जवाटप करताना नियम व निकषांचे पालन करावे आणि भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशी सूचना त्यांनी केली. बँक केवळ आर्थिक संस्था न राहता विश्वासाची संस्था म्हणून अधिक सक्षम व्हावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
सभेला बँकेच्या उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा, तज्ज्ञ संचालक प्रितम पहाडे (सी.ए.), संचालक मंडळातील सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, कार्यकारी संचालक विनोद रावळ, मुख्य सरव्यवस्थापक सोमेश्वर पवार, सरव्यवस्थापक विजय जाधव, सहायक सरव्यवस्थापक प्रशांत शिर्के यांच्यासह बँकेच्या सर्व शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेचा समारोप राष्ट्रगीताने झाला. उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here