बारामती–माळेगाव : दादांच्या ‘चेकमेट’ स्ट्रॅटेजीनं राजकीय वातावरण तापलं…

0
82

बारामती–माळेगाव : दादांच्या ‘चेकमेट’ स्ट्रॅटेजीनं राजकीय वातावरण तापलं…

नगराध्यक्ष पदाची चर्चा शिगेला; उमेदवारांच्या मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद

बारामती / माळेगाव : बारामती–माळेगाव परिसरात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार निवडीच्या हालचालींनी गुरुवारी दिवसभर राजकीय वातावरण तापले. “दादा कोणाला तिकीट देणार?” हा एकच प्रश्न कार्यकर्त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

सकाळी सात वाजल्यापासून अजित पवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आणि रात्रीपर्यंत ४७ वाढीव जागांसाठी इच्छुकांची सखोल पडताळणी करण्यात आली. राष्ट्रवादी भवनाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी तर आत दादांची शांत, काटेकोर आणि धोरणात्मक छाननी सुरू… चं..!?

बारामती–माळेगाव निवडणुकीचा थरार
बारामती नगरपरिषद : नगराध्यक्ष + ४१ नगरसेवक = ४२ जागा
माळेगाव नगरपंचायत : नगराध्यक्ष + १७ नगरसेवक = १८ जागा

बारामतीत तब्बल ३६५, तर माळेगावमध्ये १०७ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. नुकत्याच नगरपंचायतीत रूपांतर झालेल्या माळेगावच्या पहिल्या निवडणुकीमुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. संपूर्ण प्रक्रिया अजित पवार स्वतः पाहत असल्याने चर्चा अधिकच रंगतदार बनली आहे.

दिवसभर मुलाखती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
सकाळी बारामती नगराध्यक्ष पदाच्या मुलाखतींना सुरुवात झाली. त्यानंतर विविध प्रभागांच्या उमेदवारांची चर्चा पार पडली. संध्याकाळी माळेगावच्या मुलाखतींना प्रारंभ होताच वातावरणात नवा रंग चढला.

१७ नोव्हेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख असल्याने बंडाळी टाळण्यासाठी घोषणा मुद्दाम रोखून धरल्याचा कानोकानी संदेश कार्यकर्त्यांमध्ये पसरला.

अजित पवारांचा इशारा….
मेळाव्यात कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देताना अजित पवार म्हणाले—
“चुकीचं वागू नका.”
“सर्वांना तिकीट मिळू शकत नाही.”
“ज्याला तिकीट देईन, ते अजित पवार समजून स्वीकारा.”

जय पवारांच्या नावाचा उल्लेख होताच त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर दिले—
“सात भावंडांमध्ये राजकारणाची आवड माझ्यातच… जयची आवड अजून लागली की नाही, ते बघू!”

‘शेवटची निवडणूक?’—गैरसमज दूर “ही माझी शेवटची निवडणूक म्हणतात काहीजण… ३५ वर्षांत केस गेले, पण कामाचा उमेदवार देणार यात शंका नाही,” असे म्हणत दादांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

पॅनल लवकरच जाहीर होण्याची शक्यता पुढील काही दिवसांत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला असून बारामती–माळेगावमध्ये सध्या उत्सुकता, तणाव आणि अफवांच्या वातावरणात राजकीय थरार शिगेला पोहोचला आहे.

एकंदरीत
बारामती–माळेगावमध्ये निवडणुकीचा बिगुल अद्याप वाजला नसला तरी राजकीय थरारमाला सुरू झाली आहे. अजित पवारांची प्रत्येक चाल ही नव्या समीकरणांची जुळवाजुळव करणारी ठरत आहे.

आता लक्ष एकाच गोष्टीवर—नगराध्यक्ष पदाचा ‘तुरुप’ दादा कोणासाठी उघड करतात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here