बारामती बाजार समितीत शेतमालाला दमदार भाव; ज्वारी ९,५००, उडीद १०,१०० तर बाजरी ३,६५१ रुपये
बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत असून, ज्वारीला कमाल ९,५०० रुपये, उडीदाला १०,१०० रुपये, तर बाजरीला ३,६५१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कष्टाच्या मालाला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र बाजार समितीत पाहायला मिळत आहे.
बारामती बाजार समितीत ज्वारी, बाजरी, गहू, उडीद, हरभरा आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. बारामती तालुक्यासह फलटण, दौंड, इंदापूर, माण आदी भागांतूनही शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत येतो. शेतकऱ्यांकडून लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पट्टी देण्याची पद्धत असून, शेतमालाचे लिलावापूर्वी योग्य वजन व रास्त बाजारभाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी समितीचे आडतदार शिवाजी फाळके यांच्या आडतीवर शेतकरी मनोज जाधव यांच्या ज्वारीला खरेदीदार महावीर वडुजकर यांनी ९,५०० रुपये प्रतिक्विंटल बोली लावून खरेदी केली. तसेच अशोक सालपे अँड सन्स यांच्या आडतीवर शेतकरी अमित खराडे यांच्या ज्वारीला ९,४९० रुपये बाजारभाव मिळाला.

याचप्रमाणे समितीचे खरेदीदार राज केशवराव मचाले यांनी चढ्या भावाने शेतमालाची खरेदी केली. जयकुमार जिवराव शहा अँड कंपनी यांच्या आडतीवर शेतकरी घोडीराम पवार यांच्या उडीदाला १०,१०० रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी भाव मिळाला. हा उडीद खरेदीदार संतोष श्रीमल गुळवे यांनी खरेदी केला.
अशोक सालपे अँड सन्स व वैभव दशरथ शिंदे यांच्या आडतीवर शेतकरी नामदेव पवार व तानाजी कर्ण यांच्या बाजरीला ३,६५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. महावीर वडुजकर व बाळासाहेब फराटे यांनी या शेतमालाला उच्चांकी दर दिला.
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळण्यासाठी बाजार समितीचे प्रयत्न
बारामती बाजार समितीत सध्या ज्वारी २,७०० ते ९,५०० रुपये, बाजरी २,४०० ते ३,६५१ रुपये, उडीद ७,००० ते १०,१०० रुपये, गहू २,५५० ते ३,२११ रुपये आणि हरभरा ६,५०० ते ७,३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट बाजार समितीत आणून विक्री करावी, जेणेकरून मालाला बाजारातील स्पर्धात्मक दर मिळण्याची शक्यता वाढेल, असे आवाहन समितीचे सभापती श्री. विनायक गावडे यांनी केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, पारदर्शक लिलाव पद्धतीने खरेदी व्हावी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी बाजार समिती प्रशासन व व्यापारी वर्गाकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




