बारामती एमआयडीसीला केवळ महिनाभरच होऊ शकतो पाणीपुरवठा – धनंजय जामदार
अपुऱ्या पावसाअभावी यंदा मार्च/एप्रिलमध्येच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला असतानाच संभाव्य पाणीटंचाईमुळे बारामती एमआयडीसीमधील उद्योजक चांगलेच धास्तावले आहेत. सध्याचा पाणीसाठा पाहता बारामती औद्योगिक क्षेत्राला कसाबसा महिनाभर सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होणार आहे. यासाठी शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संभाव्य पाणीसंकटाला सामोरे जाण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली. उजनी धरणात कुंभारगाव येथील एमआयडीसी जॅकवेलची पाहणी करताना ते बोलत होते.
एमआयडीसीचे उपअभियंता विजय पेटकर, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, चंद्रकांत नलवडे, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, नामदेव शिंदे, रवींद्र थोरात, माधव खांडेकर आदि उद्योजक यावेळी उपस्थित होते.
धनंजय जामदार पुढे म्हणाले कालवा समितीने धरणाच्या खालील भागाला दहा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यातील पाच टीएमसी सोडण्यात आले आहे व पाच टीएमसी सोडणे बाकी आहे. यानंतर शिल्लक राहणाऱ्या पाणीसाठ्यातून मे अखेर पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन एमआयडीसीने केले आहे. परंतु पाच टीएमसी पेक्षा अधिक पाणी सोडल्यास मात्र एमआयडीसीचे नियोजन पूर्णपणे कोलमडणार असून बारामती औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा खंडित होऊन अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. याची शासनाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
एमआयडीसीचे उपअभियंता विजय पेटकर म्हणाले मे महिन्यात पाणीसाठ्याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर परिस्थितीनुसार महामंडळ पर्यायी व्यवस्था उभारून उद्योगांना पाणी पुरवणेचे सर्वोतोपरी प्रयत्न करेल. उद्योजकांनी पाणी जपून वापरावे व आवश्यक पाणी साठा करुन ठेवावा असे आवाहन केले.