बँकिंगच्या दबावात जीव गमावणाऱ्याशिवशंकर मित्रा यांच्या आत्महत्येने बारामती हादरली…!

0
53

बँकिंगच्या दबावात जीव गमावणाऱ्या
शिवशंकर मित्रा यांच्या आत्महत्येने बारामती हादरली…!

बारामती – शहराच्या मध्यवर्ती भागात, भिगवन रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा शाखेत घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना सध्या संपूर्ण बारामती शहराला विचारात टाकणारी ठरली आहे. बँकेचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा (वय ४५) यांनी गुरुवारी मध्यरात्री बँकेच्या आवारातच गळफास लावून आत्महत्या केली.

उत्तर प्रदेशचे मूळ रहिवासी असलेले मित्रा काही काळापासून बारामतीत स्थायिक होते. बँकेतील कामाचा वाढता ताण, दबाव आणि मानसिक त्रास यांना कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, त्यांनी कोणालाही दोषी ठरवू नये, असा स्पष्ट उल्लेख करत पत्नीची क्षमा मागितली आहे. त्याच चिठ्ठीत डोळे दान करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

ही घटना समजताच बँकेच्या परिसरात एकच खळबळ उडाली. बँकेचे कर्मचारी, ग्राहक आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मित्रा यांनी काही दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीची मागणी केल्याचेही समजते. मात्र, बँकेच्या यंत्रणेत अशा संवेदनशील विषयांकडे वेळेवर लक्ष न दिल्याचे या घटनेवरून अधोरेखित होते.

“शासकीय आणि राष्ट्रीय बँकांमधील कामाचा ताण किती असह्य असतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरू शकते,” अशी प्रतिक्रिया काही ज्येष्ठ बँक कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

बारामती पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

एक विचार करायला लावणारी घटना…
प्रशासन, व्यवस्थापन आणि समाज यांना आता प्रश्न विचारायलाच हवा –
कामाच्या ताणात माणूस हरवत असेल तर प्रगतीचा हा वेग नक्की कुठं नेतोय आपल्याला?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here