पुणे विभागीय भरारी पथकाकडून ११ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि.१७ : राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने ब्रम्हा सनसिटी जवळील, एफ प्लाझा बिल्डींगचा गाळा क्र. जी ५५, वडगाव शेरी मध्ये छापा घालून परदेशी बनावटीच्या मद्यासह ११ लाख ५४ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळया ब्रॅण्डच्या व क्षमतेच्या २६ सीलबंद बाटल्या तसेच एक होंडा कंपनीची अमेझ मॉडेलची चारचाकी कार तसेच एक होंडा कंपनीची ॲक्टिव्हा दुचाकी वाहन व मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ५४ हजार ५२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये एका इसमाला अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील इतर इसमांचा शोध सुरु आहे.
सदर कारवाईमध्ये विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे सह निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ए विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्या पथकांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व्ही.एम.माने करीत आहेत.
अवैध दारु निर्मिती, वाहतूक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.