नियोजित ईएसआईसी ( ESIC )हॉस्पिटलसाठी एमआयडीसीत जागेची पाहणी ….बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्रयत्नाला यश

0
63

नियोजित ईएसआईसी ( ESIC )हॉस्पिटलसाठी एमआयडीसीत जागेची पाहणी ….बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्रयत्नाला यश

केंद्रीय कामगार मंत्रालया अंतर्गत ईएसआईसीचे शंभर बेडचे हॉस्पिटल बारामतीत उभारण्यात येणार असून त्यासाठी ईएसआईसीचे महाराष्ट्राचे प्रभारी रिजनल डायरेक्टर अनिलकुमार साहू यांनी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या समवेत बारामती एमआयडीसी टप्पा क्रं २ मधील प्रस्तावित जागेची पाहणी केली. कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, उपअभियंता विजय पेटकर, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरिश्चंद्र खाडे, चंद्रकांत नलवडे, हरीश कुंभारकर, टेक्स्टाईल पार्कचे अनिल वाघ, उद्योजक भारत मोकाशी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एमआयडीसी कडून सुचवलेल्या या जागेबाबतचा तांत्रिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाणार असून त्यास मान्यता मिळालेनंतर नियोजित हॉस्पिटलचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल असे रिजनल डायरेक्टर अनिलकुमार साहू यांनी जागेची पाहणी केलेनंतर सांगितले.

धनंजय जामदार म्हणाले बारामतीमध्ये कामगारांसाठी ईएसआईसीचे दोनशे बेडचे रुग्णालय होण्यासाठी बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनने प्रस्ताव दाखल करुन सातत्याने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे ईएसआईसीने बारामतीत शंभर बेडचे हॉस्पिटल उभारण्यास मान्यता दिली. या नियोजित हॉस्पिटलसाठी पाच एकर जागेची आवश्यकता असून शासनस्तरावर याबाबत शोध सुरु होता. आता एमआयडीसीने सुचवलेली जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरल्यास लवकरच हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू होईल असा विश्वास अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केला.

बारामतीसाठी दोनशे बेडचे हॉस्पिटल मंजूर करावे अशी आमची मूळ मागणी असताना केंद्र शासनाने मात्र केवळ शंभर बेडचे हॉस्पिटल मंजूर केले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण लवकरच केंद्रीय कामगारमंत्र्यांना नवी दिल्लीत भेटून बारामतीसाठी दोनशे बेडचे हॉस्पिटल मंजूर करणेबाबत प्रयत्न करणार असलेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here