मोबाईलने अभ्यास विद्यार्थ्यांसाठी घातक !
ना पढने के ढुँढ रहे है बहाने,
बच्चे हो गये हैं मोबाईल के दीवाने…
काही दिवसांपासून चॅनल्सवर पंजाबच्या आप सरकारचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचे नाव घेत वीज बिल माफ केले म्हणून विद्यार्थिनी मुलीसाठी मोबाईल घेवू शकल्याची जाहिरात झळकत आहे. मोबाईल हा ऑनलाईन शिक्षणासाठी कसा आवश्यक असून त्यामुळे कसे शिक्षण खोळंबते, हे या जाहिरातीमध्ये सांगितले व दाखविले आहे. शेवटी ही जाहिरात आहे.
जाहिरामध्ये अधिकतर खोटेच दाखवितात. असा सर्वांचा अनुभव असतो तसाच या बाबतीतही म्हणता येईल. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) ताज्या संशोधन अहवालात ‘शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी असावी, स्मार्टफोन शाळेतून हद्दपार करावेत’ असे म्हटले आहे. तर याची कारणेही दिली आहेत.
म्हणजेच जास्त जाहिरात करुन सांगणार्या वॉशिंग पावडरने कपडे तेवढे स्वच्छ निघत नाहीत, शेविंग क्रीम किंवा ब्लेडने जाहिरातमध्ये दिसते तेवढी चोपडी दाढी होत नाही, तसेच मोबाईलमुळे जाहिरातीत सांगतात तेवढा अभ्यास एकाग्रतेने होत नाही, हे पण स्पष्ट झाले आहे.
युनेस्कोने २६ जुलै २०२३ रोजी ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टमध्ये ‘शिक्षणातील तंत्रज्ञान’ या विषयावर प्रकाशित या अहवालात शाळांमध्ये स्मार्ट फोनवर बंदी हवी, स्मार्ट फोन शाळेतून हद्दपार करावेत, असे मत व्यक्त केले आहे. विद्यार्थी मोबाईल वापरत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे, विद्यार्थ्यांच्या भावनिक स्थैर्यावरही नकारात्मक परिणाम होतो, शाळेत शिकतांना स्मार्टफोन अडसर ठरतो, असे अभ्यासअंती समोर आल्याचे म्हटले आहे.
तसेच स्क्रीन (मोबाईल) वापराचे दुष्परिणाम नमूद करतांना विद्यार्थ्यांची एकाग्रता नष्ट होणे, विद्यार्थी अधिकाधिक चंचल होणे, अस्थिर होणे, विद्यार्थ्यांची शारीरिक आणि बौध्दिक क्षमता विकसित न होणे, कला आणि क्रीडाकडे दुर्लक्ष होणे, अध्ययन क्षमता कमकुवत होणे असे प्रकार होतात तर विद्यार्थ्यांचे भावविश्व सकुंचित होत आहे. असेही म्हटल्या गेले आहे.
विद्यार्थ्यांकडून मोबाईल वापर हा विषय जगभरात चर्चेचा आहे. नेदरलँड्स, फिनलँड, कोलंबिया, इटली या देशांनी शाळेत मोबाईल वापरावर बंदी घातली आहे तर बांगलादेश, सिंगापूर येथे वर्गात वापरावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे युनेस्कोच्या अहवालानुसार अभ्यासानंतर बेल्जियम, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशातील शाळेत स्मार्टफोन हटविल्यानंतर सुधार दिसून आल्याचे नमूद आहे.
एकूणच कोविड काळात एक व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षणाचे एक साधन म्हणून मोबाईलचा वापर झाला. यामुळे जगातील सुमारे शंभर कोटीपेक्षा जास्त मुलांना काही प्रमाणात शिक्षण देता आले. तर इंटरनेट, वीज अभावामुळे लाखो मुले वंचितही राहिली. डिजीटल तंत्रज्ञान व्यवसायसाठी व इतर संबंधितांना फायद्याचे होते म्हणून याबाबत जोर वाढला, पध्दतशीरपणे मोबाईलचे मार्केटिंग केल्या गेले. पालकांनी कर्ज काढून मोबाईल घेवून दिले. तेव्हाही अनेक तज्ञ सांगत होते की, ‘प्रत्यक्ष वर्गात शिकविण्याला ऑनलाईन पध्दत पर्याय ठरु शकत नाही.’ मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले.
तो कोरोनाचा काळ ही तसाच होता म्हणावे. एक व्यवस्था म्हणून मोबाईलने शिक्षण स्वीकारल्या गेले. आणि आता मात्र संभाव्य परिणामांची दखल युनेस्कोने घेतली आहे व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन पासून दूर ठेवण्याचे, राहण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थी शिक्षकाकडून शिकतात तसेच सहकारी विद्यार्थांकडूनही बरेच काही शिकत असतात. आणि त्यामधून विकसीत होत असतात. हा महत्त्वाचा भाग आहे.
विद्यार्थ्यांना समस्या व अनुभवातूनही शिकता आले पाहिजे. त्यांनी समस्येला सामोरे जावे, अनुभव घ्यावा, समस्या, अडचणी सोडवाव्यात, त्यांनी समस्यांपासून पळून जाऊ नये, हे सर्व त्यांच्यात रुजले पाहिजे. त्यांचेवर संस्कार झाले पाहिजेत. दुसरीकडे सायबर गुन्हेगारी वाढत असतांना मुलांना मोबाईल अतिवापर घातक ठरतो. याचाही विचार करायला हवा.
युनेस्कोच्या या मताचे स्वागत होत आहे. मात्र किती पालक, शिक्षक व शिक्षण संस्था अंमलबजावणी करणार? हे लवकरच दिसून येणार आहे.
एकूणच विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर कमी व्हावा यासाठी शाळेत, शिकवणी वर्गात व अभ्यास करतांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन शिक्षक, संस्था व पालकांनी उपाय योजना केली पाहिजे, एवढे मात्र खरे!
शेवटी दुष्परिणाम अटळ आहेत, तेव्हा मात्र मोबाईलला दोषी ठरवितांना असे म्हटले जाईल…
इस बिगडी हुई जिंदगी की इतनी कहानी है,
हमे बिगाडने में इस मोबाईल की कारस्तानी है!
राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com