गोकुळाष्टमी…..

0
61

गोकुळाष्टमी
भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य

श्रावण कु. ८ गोकुळाष्टमी
भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला. तो दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जयंती होय. पाच हजार वर्षे होऊन गेली तरी हा श्रीकृष्ण जन्मोत्सव लोक आनंदाने उत्साहाने सर्वत्र साजरा करतात. मथुरा, द्वारका, वृंदावन, गोकुळ, जगन्नाथपुरी, बनारस या तीर्थक्षेत्री तर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.

यशस्वी मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्याचा संस्थापक, महान धर्मप्रचारक, भक्तवत्सल जगद्‌गुरू म्हणजे श्रीकृष्ण, सर्व दृष्टींनी पूर्णावतार आहे. आध्यात्मिक, नैतिक, राजनीतीज्ञ, समाजोद्धारक कृष्णासारखा कोणी झालेला नाही! सत्ता, संपत्तीशिवाय शेकडो लोकांची संघटना करून त्याने गवळ्यांना एकत्रित करून प्रेम संपादन केले. गोकुळातली परंपरागत इंद्रपूजा सोडून गोवर्धनाची पूजा श्रीकृष्णाने सुरू केली.

श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन एवढे सुंदर व सुसंधित बनवले होते की त्याच्याकडे पाहणाऱ्याला तो आपला वाटे. वृद्धांना आपल्या मुलासारखा वाटे. तरुणांना मित्र वाटे. राजांना राजासारखा तर भक्तांना स्वयं भगवंतासारखा तो वाटे. सामान्य लोकात आत्मप्रत्यय निर्माण करून, गवळ्यात मिसळून त्यांना धर्मयुद्धासाठी जागवले. आपल्या पराक्रमाने कंसाला ठार मारले. कालिया नागाचा नाश केला. अद्भुत बाललीलांनी श्रीकृष्ण मुलांचा आवडता देव

बनला. श्रीकृष्ण म्हणजे संस्कृतीचा निःस्पृह, निरंहकारी, नम्र उपासक. म्हणूनच त्याने दुर्योधन, कंस, कालयवन, नरकासुर, शिशुपाल, जरासंध या आसुरी प्रवृत्तीच्या दानवांचा धर्म व नीती यांच्या सुदर्शन चक्राने नाश केला. संस्कृतिवर्धक पांडवांच्यात निवास केला. कृष्णाने सामाजिक ऐक्य नजरेसमोर ठेवून समाजाचे नियमन केले. दांभिक, खोटे, लुच्चे, स्वार्थी, भोगलंपट आपले नातेवाईक होऊच शकत नाहीत; भले ते मामा, मावशी वा आत्या कोणीही असोत. जो कोणी समाजविघातक काम करेल त्याला सोडू नये अशी त्याची नीती होती.

श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेचे श्लोक कर्मयोग समजावणारे असे आहेत. त्याचे ज्ञान झोपलेल्याला उठवते, मेलेल्यात चैतन्य भरते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच गीतेच्या रूपाने श्रीकृष्णाने माणुसकीचा दिव्य संदेश दिला आहे.

अष्टमीच्या दिवशी भाविक लोक उपवास धरून रात्री बारा वाजता पाळण्यातल्या बाळकृष्णाला पाळणा म्हणून, हार फुलांनी सजवून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. दुसऱ्या दिवशी नवमीला दहीहंडी सजवून गटागटाने फोड़तात. खापराचा तुकडा धान्यात भरभराटीसाठी ठेवतात.

श्रीकृष्णाने असुर, दुर्जनांना धडा शिकवला व सज्जनांचा कैवार घेतला त्याप्रमाणे आपणही समाजातील आसुरी विघातक रुढींना प्रवृत्तींना व व्यक्तीना धडा शिकवून सुजनांचे रक्षण करण्यास सिद्ध झालो तर श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यामागील उद्देश साध्य होईल असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here