क्रीडा पत्रकार, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली….

0
21

क्रीडा पत्रकार, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा
क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला
— उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 6 :- कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि योगदान अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलिकडे जावून क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ आणि खेळाडूंना जोडण्याचं काम केलं. क्रीडाक्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जिवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडारसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here