उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ॲग्री हॅकॅथॉन संकेतस्थळाचे उद्घाटन

0
19

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ॲग्री हॅकॅथॉन संकेतस्थळाचे उद्घाटन

पुणे, दि. ७: देशातील पहिली आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉन जूनमध्ये पुण्यात आयोजित करण्यात येणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन येथे शनिवारी (दि. ५ एप्रिल) या हॅकॅथॉनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. ही स्पर्धा जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, कृषी महाविद्यालय पुणे व आत्मा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धकांना https://www.puneagrihackathon.com या संकेतस्थळावर ५ मे पर्यंत अर्ज करता येतील. आलेल्या अर्जांची पडताळणी करून स्पर्धकांची यादी १५ मे पर्यंत अंतिम करण्यात येईल. जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहात ॲग्री हॅकॅथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजित आहे.

स्पर्धेसाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येत आहे. स्पर्धेकरिता कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, संशोधन केंद्रे यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन घेण्यात येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. या स्पर्धेमध्ये कृषी व तंत्रज्ञान शाखांचे विद्यार्थी, संगणक अभियंते आदी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवतील.

कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी उपाययोजना (सोल्युशन) शोधायचे आहे. सर्वोत्तम सोलुशन सादर करणाऱ्या स्पर्धकांची प्रत्येक गटामध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिकाकरिता तज्ज्ञ समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे. प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल. स्पर्धकांकडून आलेल्या उपाययोजना व सोलुशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता त्याचे उत्पादन व विपणन प्रोत्साहन म्हणून हे पारितोषिक देण्यात येणार आहे.

ॲग्री हॅकॅथॉन ही एक अभिनव संकल्पना असून त्याद्वारे शेतीतील काढणी पश्चात होणारे नुकसान, खतांचा काटेकोर वापर, पाण्याचा कार्यक्षम वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापराद्वारे अनेक समस्यांवर उपाययोजना शोधून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here