इंडियन प्रिमियर लिगचा थरार संपून एक महिनाही व्हायचा असताना आणखी एका नव्या स्पर्धेची घोषणा झालेली आहे. त्यामुळे आठ दिवसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले जाणार आहे.ही स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेतली जाणार आहे आणि स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता मिळालेली आहे, हे विशेष.
आयपीएलने केवळ भारतालाच नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशांना वेड लावले आहे. एखाद्या उत्सवाचे स्वरुप याला आले आहे. परंतु, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंनाही त्यांचे टॅलेंट दाखविण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आता महाराष्ट्र प्रिमीयर लिगची सुरुवात झालेली आहे. ही स्पर्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये १५ जूनपासून रंगणार आहे. यावर्षी स्पर्धेत सहा संघ असून यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील टॅलेंट बघायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे स्पर्धेचे ग्लॅमर वाढविण्यासाठी केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड हे स्टार खेळाडूही स्पर्धेत खेळणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या टी-२० स्पर्धेसाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी हे मोठे व्यासपीठ असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि सोलापूर असे सहा संघ सहभागी होत आहेत. पुणे संघात ऋतुराज गायकवाड, कोल्हापूरमध्ये केदार जाधव, नाशिकमध्ये राहुल त्रिपाठी, संभाजीनगरमध्ये राजवर्धन हंगरगेकर, रत्नागिरीतून अजीम काजी आणि सोलापूरमधून विकी ओस्तवाल या स्टार खेळाडूंचा सहभाग असेल.
आयपीएलचाच फॉर्म्युला
या स्पर्धेसाठी सुद्धा आयपीएलचाच फॉर्म्युला वापरण्यात येत आहे. मंगळवारी आज ६ जूनला स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव होईल. यामध्ये पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, रत्नागिरी, जळगाव, सातारा, सांगली, अहमदनगर, बुलडाणा, धुळे, रायगड, सिंधूदुर्ग आदी शहरांमधील खेळाडू सहभागी होतील