बारामती ‘पॉवर मॅरेथॉन’चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

0
4

बारामती ‘पॉवर मॅरेथॉन’चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही मॅरेथॉन मानदंड ठरेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बारामती, दि. २९ : बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या दृष्टीने ही मॅरेथॉन वैशिष्ट्यपूर्ण आणि मानदंड ठरणारी स्पर्धा होईल. याच उत्साहाने आणि ऊर्जेने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, नगराध्यक्ष सचिन सातव, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार स्वप्निल रावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे तसेच बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन ननावरे उपस्थित होते.

बारामतीसह राज्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या धावपटूंचे स्वागत करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, अजितदादांशिवाय या मॅरेथॉनचे आयोजन होत असल्याने हा आपल्या सर्वांसाठी भावनिक क्षण आहे. बारामतीसह राज्यातील प्रत्येक खेळाडू सक्षम झाला पाहिजे, विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहिले पाहिजे, अशी अजितदादांची नेहमीच भूमिका होती. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन मिळते. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे सर्व धावपटू नव्या ऊर्जेने आणि प्रेरणेने परततील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, बारामती पॉवर मॅरेथॉनच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला राज्यस्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरवर्षी वाढत जाणारा धावपटूंचा सहभाग, स्पर्धेची वाढती लोकप्रियता आणि पुढील वर्षासाठी आतापासूनच दिसणारा उत्साह पाहता बारामती पॉवर मॅरेथॉनचा प्रवास अधिक व्यापक होत आहे.

असा होता मॅरेथॉनचा मार्ग
या मॅरेथॉनला रेल्वे स्टेशन मैदान, भिगवण रोड, बारामती येथून सुरुवात झाली. तेथून पेन्सिल चौक, विमानतळ मार्ग, भारत फोर्ज, फरेरो कंपनीमार्गे कटफळ रेल्वे स्थानकापर्यंत धावपटूंचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. कटफळ रेल्वे स्थानक येथून परतीचा प्रवास करून पुन्हा रेल्वे स्टेशन मैदान येथे मॅरेथॉनचा समारोप झाला.

या स्पर्धेत ७ हजार २७० धावपटूंनी सहभाग नोंदवला. ४२ किमी, २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशा चार गटांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अनुभवी मॅरेथॉनपटूंपासून नवोदित धावपटू, युवक-युवती, महिला आणि कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके आणि विविध वयोगटांतील विजेत्यांचा गौरव हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेला राज्यभरातील धावपटूंचा प्रतिसाद मिळत असून, बारामतीच्या क्रीडा व क्षेत्रातील उपक्रमांना नवी दिशा देणारा हा प्रयत्न ठरणार आहे. अनेक धावपटूंनी मॅरेथॉननंतर बारामती परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देत स्थानिक परिसराचा आनंद घेतला. मोरगाव येथील श्री मयूरेश्वर अष्टविनायक मंदिर, शिरसुफळ परिसरातील ग्रासलँड सफारी, विद्या प्रतिष्ठान संग्रहालय तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांना भेट देण्याची संधी अनेकांनी साधली. त्यामुळे मॅरेथॉनच्या निमित्ताने बारामतीची क्रीडा, पर्यटन, कृषी आणि सांस्कृतिक ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

यावेळी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे सदस्य-विश्वस्त , बारामती नगरीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू-भगिनी आणि हजारो धावपटू उपस्थित होते.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here