बारामती पॉवर मॅरेथॉनचा उत्साह शिगेला; ७ हजार २७० धावपटूंची नोंदणी, वाहतुकीत मोठे बदल!
२९ नोव्हेंबरला रंगणार मॅरेथॉनचे चौथे पर्व; २८ व २९ नोव्हेंबरला शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद
बारामती, प्रतिनिधी : क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण केलेल्या बारामतीमध्ये ‘इंडियाज् आयकॉनिक बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनच्या चौथ्या पर्वासाठी तब्बल ७ हजार २७० धावपटूंनी नोंदणी केली असून, रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत.
यंदाची मॅरेथॉन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठबळातून सुरू झालेल्या या उपक्रमाने अवघ्या चार वर्षांत मोठी झेप घेतली आहे. २०२३ मध्ये अवघ्या ७२७ धावपटूंच्या सहभागातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये यंदा ७ हजार २७० धावपटूंनी नोंदणी केली आहे. त्यामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातील वाढती लोकप्रियता अधोरेखित होत आहे.

मॅरेथॉननिमित्त २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवारी स्पोर्ट्स एक्स्पो, धावपटूंना बिब वितरण, विविध खेळ, मॅजिक शो आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशी विविध आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहेत. स्पोर्ट्स एक्स्पोमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा ब्रँड्सचे सुमारे ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मॅरेथॉनच्या निमित्ताने बारामतीत क्रीडा आणि मनोरंजनाची पर्वणी अनुभवायला मिळत आहे.
रेल्वे स्टेशन ग्राउंडवरून मॅरेथॉनला सुरुवात

रविवारी सकाळी भिगवण रोडवरील रेल्वे स्टेशन ग्राउंड येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. तेथून पेन्सिल चौक, विमानतळ मार्ग, भारत फोर्स आणि फेरेरो कंपनीपर्यंत धावपटूंचा मार्ग असणार आहे. पुढे कटकळ स्टेशन येथे यू-टर्न घेऊन याच मार्गाने धावपटू पुन्हा रेल्वे स्टेशन ग्राउंडवर परतणार असून तेथे स्पर्धेची सांगता होणार आहे.

२८ व २९ नोव्हेंबरला वाहतुकीत बदल
मॅरेथॉन सुरळीत पार पडावी आणि धावपटूंची सुरक्षितता राखली जावी, यासाठी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत किंवा मॅरेथॉन संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत.
यामध्ये तीन हत्ती चौक ते पंचायत समिती चौक हा मुख्य रस्ता व सर्व्हिस रोड, तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक ते मेडिकल हॉस्पिटलजवळील चौक हा मार्ग दोन्ही बाजूंनी, तसेच मेडिकल कॉलेज चौक ते फेरेरो कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार हा पियाजो कंपनीच्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
भिगवणकडे जाणारी व भिगवणहून येणारी वाहतूक तीन हत्ती चौक, माळावरची देवी, जळोची आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने वळविण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मागील बाजूने ग. दि. मा. सभागृह, अभिषेक कॉर्नर आणि रुईपाटी मार्गाचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे. पाटस रस्त्यावरील वाहतुकीसाठी पालखी मार्ग, रेल्वे सर्कल आणि नवीन पालखी मार्गाचा वापर करता येणार आहे. मेहता हॉस्पिटल व महिला हॉस्पिटल मार्गे एमआयडीसीकडे जाणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मुख्य रस्त्याच्या सेवा रस्त्यांवरून स्थानिक रहिवाशांची वाहतूक सुरू राहणार आहे.
बारामतीकरांसमोर क्रीडा महोत्सवाचे आव्हान आणि उत्सव
एका बाजूला हजारो धावपटूंच्या सहभागामुळे बारामतीत क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे वाहतूक बदलांमुळे नागरिकांना नियोजन करून घराबाहेर पडावे लागणार आहे. नागरिकांनी बंद रस्त्यांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
७२७ धावपटूंपासून सुरू झालेल्या मॅरेथॉनने यंदा ७ हजार २७० धावपटूंचा टप्पा गाठल्याने बारामतीच्या क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबरचा रविवार बारामतीसाठी केवळ मॅरेथॉनचा दिवस न ठरता क्रीडानगरीच्या वाढत्या लौकिकाचा उत्सव ठरणार आहे.




