मराठवाड्याचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करा – सुनेत्रा पवार

0
4

मराठवाड्याचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करा – सुनेत्रा पवार

बीडच्या विकासासाठी अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी; दुष्काळाच्या संकटात शेतकरी व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही

बीड, दि. १७ ऑक्टोबर : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. सतीश चव्हाण यांनी गेल्या १८ वर्षांत मराठवाड्यातील पदवीधरांसह विविध समाजघटकांचे प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडले आहेत. मराठवाड्याचा आवाज विधिमंडळात अधिक बुलंद करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. बीड येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
अजितदादांनी दिलेला विश्वास आणि विकासाची स्वप्ने पूर्ण करणार
अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील जनतेला जो विश्वास आणि आधार दिला, तोच विश्वास आणि प्रेम जपण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे, असे सांगून सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बीडच्या विकासासाठी अजितदादांनी अनेक कामे हाती घेतली होती. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी स्वप्ने पाहिली आणि अनेक शब्द दिले होते. ही स्वप्ने साकार करणे आणि दिलेले शब्द पूर्ण करणे ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याचा शब्द अजितदादांनी दिला होता. त्यांच्या पश्चात हे काम पूर्ण करता आले, याचा आनंद आणि अभिमान आहे. अजितदादांची विकासाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपली ताकद वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


१८ वर्षांचा अनुभव, विधिमंडळात प्रश्नांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
सतीश चव्हाण यांना अजितदादांनी २००८ मध्ये पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर सलग तीन टर्म मराठवाड्यातील पदवीधरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. गेल्या १८ वर्षांत त्यांनी पदवीधर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, कष्टकरी आणि कामगार अशा विविध घटकांचे प्रश्न विधानपरिषदेत सातत्याने मांडले आहेत, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षांतील त्यांच्या संसदीय कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सतीश चव्हाण यांनी ६७७ तारांकित प्रश्न, ९७ लक्षवेधी सूचना, अर्ध्या तासाच्या चर्चेत ५५ वेळा सहभाग आणि नियम २६० अंतर्गत प्रस्तावांमध्ये २२ वेळा सहभाग नोंदवला आहे. याशिवाय विविध संसदीय आयुधांचा वापर करून त्यांनी मराठवाड्यातील प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत.
लोकप्रतिनिधीने जनतेचे प्रश्न समजून घेणे, ते योग्य पद्धतीने विधिमंडळात मांडणे आणि प्रश्न सुटेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. सतीश चव्हाण यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा अनुभवी प्रतिनिधी मराठवाड्याला आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण, रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधांवर भर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा आठही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या भागाने अनेक संकटांचा सामना केला असला, तरी संकटांवर मात करण्याची जिद्दही येथील जनतेने दाखवली आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. रेल्वेचा विस्तार आणि सी-ट्रिपल-आयटीसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून या भागाच्या विकासाचा भक्कम पाया घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
अजितदादांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला, विकासाच्या अनुशेषाला आणि तरुणांच्या भवितव्याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांची कार्यपद्धती आणि विकासाची दूरदृष्टी पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. विधानपरिषदेत मराठवाड्याचे प्रश्न ताकदीने मांडण्यासाठी सतीश चव्हाण यांच्यासारखा अनुभवी प्रतिनिधी आवश्यक असून, त्यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सामान्य जनतेला एकटे पडू देणार नाही
महाराष्ट्रासमोर सध्या दुष्काळाचे मोठे संकट उभे आहे. गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील काही भागांचा दौरा केला असता तेथील परिस्थिती अत्यंत बिकट आणि चिंताजनक असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या अडचणी आणि विविध प्रश्न समजून घेतले असून, आज बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावाही घेतला आहे.
या संकटाच्या काळात शेतकरी आणि सामान्य माणसाला आम्ही एकटे पडू देणार नाही, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
या सभेला पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार जयंत जाधव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here