गणेश फेस्टिव्हल स्व अजितदादांना समर्पित किर्तन महोत्सव मध्ये भक्तिरसाची बरसात; ह.भ.प : चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाने बारामतीकर मंत्रमुग्ध

0
6

गणेश फेस्टिव्हलमध्ये भक्तिरसाची बरसात; हभप चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाने बारामतीकर मंत्रमुग्ध

बारामती प्रतिनिधी दि.१९ शनिवार
अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना समर्पित कीर्तन महोत्सव; प्रवीणदादा माने यांच्या संकल्पनेतून भक्ती, विचार चळवळ समाजप्रबोधनच…

बारामती : अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘गणेश फेस्टिव्हल २०२६’ अंतर्गत स्वर्गीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार यांच्या स्मृतींना समर्पित भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन सूर्यनगरी, बारामती येथे करण्यात आले. अनंत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा बारामती नगर परिषदेचे नगरसेवक प्रवीणदादा माने यांच्या पुढाकारातून आणि कुशल नियोजनातून साकारलेल्या या भक्तिमय सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी हभप चैतन्य महाराज वाडेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांना अक्षरशः भक्तिरसात चिंब भिजवले. महाराजांच्या ओघवत्या वाणीला अभंग, दाखले, विनोद आणि समाजप्रबोधनाची प्रभावी जोड लाभल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय तसेच विचारमय झाले.


“जन्माचें तें मूळ पाहिलें शोधून । दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥
पापपुण्य करूनि जन्मा येतो प्राणी । नरदेहीं येऊनी हानी केली ॥”
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून हभप चैतन्य महाराज वाडेकर यांनी मानवी जन्माचे महत्त्व आणि मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करण्याचा अत्यंत मार्मिक संदेश दिला.
मनुष्यजन्म हा केवळ भौतिक सुख, पैसा, मान-सन्मान आणि विषयभोगासाठी नसून नामस्मरण, सदाचार, परोपकार, समाजसेवा आणि आत्मकल्याणासाठी मिळालेली अमूल्य संधी आहे, असा विचार महाराजांनी आपल्या प्रभावी निरूपणातून मांडला. संसारात राहून कर्तव्ये पार पाडताना भगवंताचे स्मरण आणि चांगल्या कर्मांची साथ सोडू नये, असेही त्यांनी सांगितले.
“मनुष्यजन्म मिळणे ही समस्या नाही; मिळालेला अमूल्य नरदेह वाया घालवणे ही खरी हानी आहे, हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा गाभा आहे,” या आशयाने महाराजांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील भक्ती, मानवता, परोपकार, निःस्वार्थ कर्म आणि समाजसेवेचा संदेश प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचविण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळा न राहता भक्तीबरोबरच विचारांची आणि संस्कारांची मेजवानी ठरला.
अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सवाला केवळ मनोरंजनाची जोड न देता भक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि समाजप्रबोधनाचा आयाम देण्याचा प्रवीणदादा माने यांचा प्रयत्न या कीर्तन महोत्सवातून प्रकर्षाने जाणवला.
स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना समाजाला सकारात्मक विचारांची दिशा देणारा हा उपक्रम बारामतीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणात विशेष ठसा उमटवणारा ठरला.
गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात अभंगांचा गजर, महाराजांची प्रभावी वाणी आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण यामुळे सूर्यनगरीत जणू भक्तीचा जागरच रंगला.
अनंत युवा प्रतिष्ठानच्या नियोजनबद्ध आयोजनातून आणि प्रवीणदादा माने यांच्या पुढाकारातून साकारलेला हा कीर्तन महोत्सव बारामतीकरांसाठी भक्ती, विचार आणि समाजप्रबोधनाचा अविस्मरणीय अनुभव ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here