दंगलकार कवी नितीन चंदनशिवे : क्रांतिकारी विचारांची जाज्वल्य मशाल
पहिल्या नजरेत पाहिले तर कवी नितीन चंदनशिवे हे अत्यंत साधे, सरळ आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व वाटते. मात्र या साधेपणाच्या आड समाजपरिवर्तनाची तळमळ, क्रांतिकारी विचारांची धार आणि समाजप्रबोधनाची असामान्य ताकद दडलेली आहे. त्यांच्या भाषणात आणि कवितांमध्ये केवळ शब्द नसतात, तर समाजातील अन्यायाविरुद्धचा आवाज, परिवर्तनाची हाक आणि नव्या विचारांची बीजे असतात.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या मातीतून घडलेले दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या बळावर महाराष्ट्रभर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजप्रबोधन, परिवर्तन आणि चळवळीची दिशा देणारे त्यांचे विचार सामान्य माणसालाही सहज समजतील अशा सोप्या भाषेत मांडले जातात. त्यामुळे त्यांचे प्रत्येक व्याख्यान आणि प्रत्येक कविता थेट लोकांच्या मनापर्यंत पोहोचते.
भल्याभल्यांना जमत नाही ते मोजक्या शब्दांत प्रभावीपणे मांडण्याची कला चंदनशिवे यांच्याकडे आहे. समाजातील जखमांवर बोट ठेवत असतानाच परिवर्तनाचा मार्गही ते दाखवतात. त्यांच्या शब्दांमध्ये संघर्षाची जाणीव आहे, तर विचारांमध्ये क्रांतीची ऊर्जा आहे. म्हणूनच आज ते केवळ कवी म्हणून नव्हे, तर एक प्रभावी समाजप्रबोधनकार आणि चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
मागील काही दिवसांपूर्वी बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची भेट घेण्याचा योग आला. त्या वेळी त्यांना साप्ताहिक ‘” “दिवाळी विशेष अंक २०२५” भेट देताना विशेष आनंद झाला. उपस्थितांपैकी काहींनी उत्सुकतेने विचारले की, या अंकामध्ये नितीन चंदनशिवे यांच्याविषयी काय प्रकाशित झाले आहे? त्यावेळी संबंधित पान उघडून दाखवले असता त्यांनी अत्यंत नम्रतेने अभिनंदन केले आणि आभार व्यक्त केले. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर कार्य करणारा माणूस आजही जमिनीशी नाळ जोडून आहे, याची प्रचिती त्या क्षणी आली.
त्यांच्यासोबत झालेल्या संवादातून, त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक प्रसंग ऐकताना आणि त्यांचे विचार जवळून अनुभवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—हा माणूस केवळ कविता करत नाही, तर विचारांची चळवळ उभी करतो. समाजातील प्रश्नांना भिडणारे आणि परिवर्तनासाठी प्रेरणा देणारे त्यांचे कार्य आज अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
क्रांतीची मशाल हातात घेऊन समाजप्रबोधनाचा लढा उभा करणाऱ्या दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांना मनापासून सलाम. त्यांचे विचार, त्यांची भूमिका आणि समाजपरिवर्तनासाठीची त्यांची बांधिलकी येणाऱ्या काळात आणखी व्यापक पातळीवर पोहोचेल, यात शंका नाही. साधेपणातून असामान्यता सिद्ध करणारे हे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरणादायी आहे.
– संतोष शिंदे
संपादक भावनगरी
९८२२७३०१०८






