मनात हट्ट, पायात ताकद आणि काळुबाईची कृपा… २३७ किमीचा अविस्मरणीय सायकल प्रवास ….
तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मांढरदेवी काळुबाईचा सायकल प्रवास पूर्ण करण्याचा योग आला. कित्येक वेळा हा प्लॅन ठरला… आणि काही ना काही कारणाने पुढे ढकलला गेला. पण यावेळी मनाशी पक्कं ठरवलं होतं — काहीही झालं तरी हा प्रवास पूर्ण करायचाच.
पहाटे कसबा येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पहाटे ४:४५ वाजता प्रवासाला सुरुवात केली. पहाटेच्या शांत वातावरणात सायकलचे पेडल फिरत होते. हवेत गारवा होता… पण अंगातून घामही वाहत होता. माळेगावला पहिल्या चहाचा घोट घेतला आणि पुढे निघालो.
निरा येथे सकाळी पोहोचलो तेव्हा भूक लागली होती. तेथील जुन्या गुजर रेस्टॉरंटमध्ये गरमागरम मिसळ आणि चहा घेतला. सकाळची देवाची गाणी, समोरचा नाश्ता आणि पुढच्या प्रवासाची ओढ… वेगळीच ऊर्जा मिळाली. निरामाई नदीचं सकाळचं सुंदर दृश्य डोळ्यात साठवत पुढे लोणंदच्या दिशेने निघालो.
समोर सालपे घाट उभा होता… जणू परीक्षा घेण्यासाठीच. घाट चढताना अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सकाळ असूनही उन्हाचा चटका जाणवत होता. पण घाट पार केल्यावर घेतलेला तो सुटकेचा निःश्वास आजही आठवतो.
पुढे पिंपोडे येथे मित्र उमेश मदने भेटला. भेट होताच त्याने अगदी मनापासून विचारपूस केली, उसाचा रस, आईस्क्रीम देऊन प्रेमाने पाहुणचार केला. प्रवासात अशी माणसं भेटली की थकवा थोडा हलका होतो.
सुरूर पार करून मांढरदेवीच्या दिशेने वळालो… आणि खरी अग्निपरीक्षा तिथून सुरू झाली. पुढे डोंगर… चढ… वळणं… आणि शेवटचे ६ किमी तर अक्षरशः शरीराची मर्यादा तपासणारे. पाय साथ देत नव्हते… शरीर पूर्ण थकलं होतं… पण मन अजूनही म्हणत होतं — “हार मानायची नाही.”
शेवटी सायकल हातात घेऊन चालतच चढाई सुरू ठेवली. त्या डोंगररांगांमध्ये एकटा… समोर उंच चढ… आणि मनात फक्त काळुबाईचं नाव…
सायंकाळी ५:४५ च्या सुमारास अखेर काळुबाईच्या मंदिरात पोहोचलो… आणि मंदिराचं दर्शन होताच दिवसभराचा सगळा थकवा क्षणात निघून गेला.
दर्शन रांगेत उभा राहिलो… काळुबाईचं ते मनमोहक, प्रसन्न आणि तेजस्वी रूप डोळ्यात साठवलं… आणि मन भरून आलं.
त्यावेळी मंदिरातील ट्रस्टचे सदस्य आणि पुजारी श्री माऊली क्षीरसागर यांनी प्रेमाने सायकल प्रवासाची माहिती विचारली. एवढ्या लांबून सायकलवर आल्याचं ऐकल्यावर त्यांनी पाठीवर हात ठेवून कौतुक केलं… स्वहस्ते श्रीफळ देऊन सन्मान केला… अभिनंदन केलं… तो क्षण आयुष्यभर विसरणार नाही. त्या कौतुकात, त्या आशीर्वादात सगळ्या प्रवासाचं सार होतं.
मंदिर परिसरात फोटो काढले… मनसोक्त वेळ घालवला… खाली आल्यावर तेथील नाथा मांढरे यांनीही प्रेमाने विचारपूस करत पाहुणचार केला. त्या माणुसकीने मन भारावून गेलं.
मनात होतं हा प्रवास एका दिवसात पूर्ण करायचा… पण बहुतेक काळुबाईच्या मनात काही वेगळंच होतं…
“आज माझ्या घरी मुक्काम करून जा…”
आणि त्या रात्री काळुबाईच्या गडावर मुक्काम घडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचा भावपूर्ण निरोप घेऊन वाईकडे निघालो. घाट उतरताना दिसलेलं धोम धरण, वाईचा कृष्णा घाट, महागणपतीचं दर्शन… प्रत्येक क्षण मनात साठवत परतीचा प्रवास सुरू राहिला.
प्रवासात थकवा होता… वेदना होत्या… उन्ह होतं… चढ होते… पण त्याहून मोठी होती जिद्द… श्रद्धा… आणि काळुबाईची कृपा.
हा फक्त २३७ किमीचा सायकल प्रवास नव्हता…
हा प्रवास होता
हट्टाचा… संघर्षाचा… श्रद्धेचा… आणि स्वतःशी केलेल्या वचनपूर्तीचा.

विशेष आभार : श्री. श्रीनिवास वायकर सर
संस्थापक – बारामती सायकल क्लब
आपल्या प्रेरणेमुळे हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करण्याची ऊर्जा मिळाली.
प्रवास वर्णन व लेखन : कपिल माने





